Maharashtra Vidhan Sabha Election Results 2019 Analysis: महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक २० नोव्हेंबर रोजी होणार असून २३ नोव्हेंबर रोजी निकाल लागणार आहे. २०१९ ची निवडणूक झाल्यापासून महाराष्ट्रातील राजकारणाने अनेक वेळा कूस बदलली. २०१९ ची निवडणूक काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी आणि शिवसेना-भाजपा युतीने एकत्र लढविली होती. मात्र निवडणुकीनंतर भाजपा बहुमतापासून बरीच दूर राहिल्याचे लक्षात आल्यानंतर शिवसेनेकडून मुख्यमंत्रीपदाचा आग्रह धरण्यात आला. मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेनेकडून खासदार संजय राऊत हे रोज माध्यमांसमोर येऊन भाष्य करत होते. ज्यामुळे युतीत तणाव निर्माण झाला आणि शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी अशी आगळीवेगळी महाविकास आघाडी साकारली गेली. तत्पूर्वी २०१९ च्या निवडणुकीत काय चित्र होते? हे पाहू.
पक्षीय बलाबल किती होते?
२०१९ च्या निवडणुकीत २८८ विधानसभा मतदारसंघात झालेल्या मतदानाची सरासरी आकडेवारी ६१.४ टक्के एवढी होती. भाजपाने २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत १६४ मतदारसंघात उमेदवार उभे केले होते. त्यापैकी १०५ जागांवर त्यांचा विजय झाला. संयुक्त शिवसेनेने १२८ जागांवर निवडणूक लढविली आणि त्यांना केवळ ५६ जागा जिंकता आल्या. तर आघाडीमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने १२१ जागा लढविल्या होत्या आणि त्यापैकी त्यांना ५४ जागांवर विजय मिळाला. तर काँग्रेसने १४७ जागा लढविल्या होत्या. त्यापैकी त्यांना ४४ ठिकाणी विजय मिळाला.
इतर पक्षांपैकी बहुजन विकास आघाडीने तीन, एमआयएम, प्रहार जनशक्ती पक्ष आणि समाजवादी पक्षाने प्रत्येकी दोन जागांवर विजय मिळविला होता. स्वाभिमानी पक्ष, राष्ट्रीय समाज पक्ष, शेतकरी कामगार पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, क्रांतिकारी शेतकरी पक्ष, जन सुराज्य शक्ती आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने प्रत्येकी एक जागा जिंकली होती. तर संपूर्ण राज्यातून १३ अपक्ष आमदार निवडून आले होते.
u
भाजपा आणि शिवसेनेचे मतदान घसरले
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाची मतदानाची टक्केवारी आधीच्या निवडणुकीपेक्षा कमी झाल्याचे दिसले. २०१४ च्या निवडणुकीत भाजपाने १ कोटी ४७ लाख मतदान घेऊन १२२ जागा जिंकल्या होत्या. तर २०१९ च्या निवडणुकीत भाजपाने १ कोटी ४२ लाख मतदान घेऊन १०५ जागा जिंकल्या होत्या. शिवसेनेनेही २०१४ साली १ कोटी २ लाख इतके मतदान घेऊन ६३ जागा जिंकल्या होत्या. २०१९ साली त्यांना ९० लाख ४९ हजार इतके मतदान आणि ५६ जागा जिंकता आल्या.
किती महिला आमदार निवडून आल्या?
२०१९ च्या विधानसभेत २४ महिला आमदार निवडून आल्या होत्या. त्यापैकी दोन अपक्ष आमदार होत्या. २०१४ च्या विधानसभेत २२ महिला आमदार होत्या.
२३ नोव्हेंबर २०१९ रोजी सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी भाजपाशी हातमिळवणी करत उपमुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तथापि बहुमत सिद्ध करण्याआधीच २६ नोव्हेंबर २०१९ रोजी बहुमत सिद्ध करण्यात अपयश येत असल्याचे पाहून दोन्ही नेत्यांनी राजीनामा दिला.