Baramati Exit Poll 2024 : लोकसभेच्या मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आज देशभरातील ५४३ लोकसभा मतदारसंघातील एक्झिट पोलचे अंदाज वर्तविण्यात आले आहेत. देशभरातून पुन्हा एकदा एनडीएला कौल मिळाला असला तरी महाराष्ट्रात धक्कादायक निकाल लागण्याची शक्यता एक्झिट पोलमधून वर्तविली जात आहे. आघाडीच्या एक्झिट पोल्सनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला एकच जागा मिळत असल्याचा अंदाज वर्तविला आहे. ही एक जागा रायगडमधील सुनील तटकरे यांची असल्याचे म्हटले जाते. इतर एक्झिट पोल्सनी मात्र अजित पवार गटाला चारपैकी शून्य जागा मिळणार असल्याचे सांगितले आहे. याचा अर्थ अजित पवारांनी अतिशय प्रतिष्ठेच्या केलेल्या बारामतीमधून सुनेत्रा पवार यांचा पराभव होऊ शकतो, असा अंदाज वर्तविला जात आहे.
Maharashtra Exit Poll 2024 : फुटीर राजकारणाला जनतेने मतांमधून उत्तर दिलं? काय सांगतात एक्झिट पोल
टीव्ही ९ पोलस्ट्राटच्या एक्झिट पोलमध्ये सुनेत्रा पवार पिछाडीवर असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. अर्थात हा अंदाज असला तरी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जातो. कारण याच एक्झिट पोलमध्ये अजित पवार गटाला एकही जागा मिळत नसल्याचे दाखविण्यात आले आहे.
अजित पवार गटाने बारामतीमध्ये सुनेत्रा पवार आणि रायगडमध्ये सुनील तटकरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या दोन मतदारसंघात एक उमेदवार कुटुंबातील आणि दुसरा उमेदवार पक्षाचा प्रमुख नेता आहे. तर शिरूर लोकसभेसाठी शिवाजीराव आढळराव पाटील यांना शिवसेना शिंदे गटातून आयात करावे लागले आहे. तर धाराशिव लोकसभा मतदारसंघासाठी भाजपाचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांना उमेदवारी द्यावी लागली आहे. तसेच राष्ट्रवादीने आपल्या कोट्यातील परभणीची जागा राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांना दिली आहे.
दरम्यान, एबीपी-सी व्होटरच्या सर्वेक्षणानुसार महायुतीला महाराष्ट्रात २५ जागाही मिळणार नाहीत. या सर्वेक्षणानुसार राज्यात महायुतीला २४ आणि महाविकास आघाडीला २३ जागा मिळतील. तर एका जागेवर अपक्ष उमेदवार निवडून येऊ शकतो. एबीपीच्या अंदाजानुसार सांगली लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांचा विजय होऊ शकतो. एबीपीच्या सर्वेक्षणानुसार राज्यात भाजपाला १७, शिंदेंच्या शिवसेनेला ६, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला एक जागा मिळू शकते. तर महाविकास आघाडीत ठाकरेंच्या शिवसेनेला ९, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला ६ आणि काँग्रेसला ८ जागा मिळू शकतात. यासह एक जागा अपक्ष उमेदवाराला मिळण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्राच्या ४८ मतदारसंघाबाबत एक्झिट पोल काय सांगतात?
इंडिया न्यूज डी डायनॅमिक्स
महायुती – ३४
मविआ – १३
अपक्ष – १
न्यूज २४ चाणक्य
महायुती – ३३
मविआ – १५
रिपब्लिक भारत-मॅट्रीझ
महायुती – ३० ते ३५
मविआ – १३ ते १९
रिपब्लिक PMARQ
महायुती – २९
मविआ – १९
टीव्ही ९ पोलस्ट्राट
महायुती – २२
मविआ – २६
एबीपी-सी व्होटर
महायुती – २४
मविआ – २३
अजित पवार गट – १
टाइम्स नाऊ
महायुती – २६
मविआ – २२
न्यूज १८
महायुती – ३२-३५
मविआ – १५-१८