Maharashtra Exit Poll 2024 : महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक पार पडली आहे. या निवडणुकीसाठी आत्तापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार ५९ टक्के मतदान झालं आहे. महाविकास आघाडी की महायुती याचा फैसला २३ नोव्हेंबर रोजी होणार आहे. मात्र मतदान संपल्यानंतर तातडीने एक्झिट पोल्स समोर आले आहेत. विविध दहा एक्झिट पोल्सपैकी ( Maharashtra Exit Poll 2024 ) सहा पोल्सनी महायुतीचं सरकार येईल असा अंदाज वर्तवला आहे. झारखंड आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यांचे निकाल २३ नोव्हेंबरला लागणार आहेत. एका एक्झिट पोलने ( Maharashtra Exit Poll 2024 ) मुख्यमंत्री म्हणून कुणाला लोकांची सर्वाधिक पसंती आहे आणि कुणाला कमी पसंती आहे याचा अंदाज वर्तवला आहे.
महाराष्ट्रात पार पडलेली निवडणूक काहीशी वेगळी
महाराष्ट्रात पार पडलेली निवडणूक वेगळी ठरली आहे. कारण यावेळी महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा थेट सामना आहे. इतके दिवस जे चार प्रमुख पक्ष होते त्यातल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन तुकडे झाले आहेत. आता एक्झिट पोल्सच्या ( Maharashtra Exit Poll 2024 ) अंदाजानुसार महायुतीची सत्ता येईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. नेमकं काय घडतं ते २३ नोव्हेंबरला स्पष्ट होणार आहे. २०१९ ला महायुती विरुद्ध काँग्रेस राष्ट्रवादीची आघाडी असा सामना झाला होता. मात्र निकालानंतर सगळंच चित्र बदललं होतं. त्यावेळी निकालाच्या दिवशी उद्धव ठाकरेंनी सगळे पर्याय खुले आहेत सांगितलं. त्यानंतर पहाटेचा शपथविधी, महाविकास आघाडीचा प्रयोग, २०२२ चं एकनाथ शिंदेंचं बंड, २०२३ चं अजित पवारांनी महायुतीत येणं या सगळ्या घडामोडी महाराष्ट्राने पाहिल्या आहेतच. लोकसभेला या सगळ्या प्रयोगांचा भाजपाला फटकाही बसला होता. आता विधानसभा निवडणुकीत भाजपा महायुती कमबॅक करेल असं एक्झिट पोलचे अंदाज सांगत आहेत. मुख्यमंत्री म्हणून कुणाला पसंती? हे आपण जाणून घेऊ.
हे पण वाचा- Maharashtra Assembly Elections Exit Poll 2024 : १० पैकी ६ एक्झिट पोल महायुतीच्या बाजूने, काय आहे अंदाज?
पिपल्स पल्सच्या एक्झिट पोलनुसार मुख्यमंत्री म्हणून कुणाला पसंती?
एकनाथ शिंदे यांना ३५.८ टक्के लोकांनी पहिली पसंती दर्शवली आहे. तर २१.७ टक्के लोकांनी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री म्हणून पसंती दर्शवली आहे. देवेंद्र फडणवीस यांना ११.७ टक्के लोकांनी मुख्यमंत्री म्हणून पसंती दर्शवली आहे तर अजित पवार यांना २.३ टक्के लोकांनी पसंती दर्शवली आहे. नाना पटोले यांना १.२ टक्के लोकांनी पसंती दर्शवली आहे. अर्थात पीपल्स पल्सचा ( Maharashtra Exit Poll 2024 ) हा अंदाज आहे. प्रत्यक्षात नेमकं काय होणार हे २३ नोव्हेंबरला निकाल काय लागतो आणि जनमताचा कौल कुणाला आहे हे चित्र स्पष्ट झाल्यावरच कळणार आहे.
प्रमुख एक्झिट पोल्सच्या अंदाजानुसार राज्यात महायुतीचं सरकार
दुसरीकडे महत्वाच्या पोल्सनी महायुतीचं सरकार स्थापन होईल हेच अंदाज वर्तवले आहेत. चाणक्यच्या एक्झिट पोलनुसार महायुतीला १५२ ते १६० जागा मिळतील हा अंदाज आहे. तर याच पोलनुसार महाविकास आघाडीला साधारण १३० ते १३८ जागा मिळतील असा अंदाज आहे. मॅटरिझच्या पोलनुसार महायुतीला १५० ते १७० जागा आणि महाविकास आघाडीला ११० ते १३० जागा मिळतील असा अंदाज आहे. नेमकं काय होणार? याचं उत्तर २३ नोव्हेंबरला मिळणार आहे.