Maharashtra Lok Sabha Election Results 2024 : मागील दोन्ही लोकसभा निवडणुकांमध्ये (२०१४ आणि २०१९) देशभर पंतप्रधान नरेंद्र मोदींची लाट पाहायला मिळाली. मोदींच्या या लाटेमुळे या दोन्ही निवडणुकांमध्ये भाजपाने बहुमताचा टप्पा गाठला होता. भाजपाने २०१४ च्या निवडणुकीत २८२, तर २०१९ च्या निवडणुकीत ३०२ जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे गेली १० वर्षे मोदी देशाचं पंतप्रधानपद भूषवत आहेत. परंतु, यंदाच्या निवडणुकीत मोदी लाट पाहायला मिळाली नाही. अनेक राजकीय विश्लेषकांसह भाजपा नेत्यांनी, तसेच त्यांच्या मित्रपक्षांनी ही गोष्ट जाहीरपणे मान्य केली आहे. महाराष्ट्रात महायुतीसमोर महाविकास आघाडीने तगडं आव्हान निर्माण केलं आहे. त्यामुळे महायुतीच्या उमेदवारांसाठी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींना महाराष्ट्रात ठाण मांडून बसावं लागलं. महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींना राज्यभर मतं मागत फिरावं लागलं. त्यांनी यंदा निवडणुकीच्या प्रचारासाठी महाराष्ट्रात १८ सभा घेतल्या. तसेच मुंबईत रोड शो देखील केला. मोदींच्या या सभांचा महायुतीच्या उमेदवारांना फायदा झाला का? असा प्रश्न राज्यातील नागरिकांना पडला आहे.
दुपारी १ वाजेपर्यंत हाती आलेल्या निवडणुकीच्या निकालांनुसार मोदींची महाराष्ट्रात लाट नाही हे सिद्ध झालं आहे. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात महायुतीच्या ज्या १८ उमेदवारांसाठी प्रचारसभा घेतल्य होत्या, त्यापैकी बहुसंख्य उमेदवार मतमोजणीत पिछाडीवर आहेत. मोदींनी राज्यभर १८ सभा घेतल्या. यासह मुंबईतील उमेदवारांसाठी दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर सर्व सहा उमेदवारांसाठी संयुक्त सभा घेतली. त्याचबरोबर मुंबईत एक रोड शो देखील केला. मात्र या १८ सभांचा मतदारांवर फारसा परिणाम झाल्याचं दिसत नाहीये. पंतप्रधान मोदींनी महायुतीच्या ज्या १८ उमेदवरांसाठी प्रचारसभा घेतल्या त्यापैकी १५ उमेदवार पिछाडीवर असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
मोदींनी सभा घेतलेले मतदारसंघ आणि तिथे आघाडीवर असलेले उमेदवार
- चंद्रपूर – सुधीर मुनगंटीवार (भाजपा) पिछाडीवर – या मतदारसंघात काँग्रेसच्या प्रतिभा धानोकरकर ८२ हजार आघाडीवर
- रामटेक – राजू पारवे (शिंदे गट) पिछाडीवर – या मतदारसंघात काँग्रेसचे श्यामकुमर बर्वे ३२ हजार मतांनी आघाडीवर आहेत.
- वर्धा – रामदास तडस (भाजपा) पिछाडीवर – या मतदारसंघात शरद पवार गटाचे अमर काळे १५ हजार मतांनी आघाडीवर आहेत.
- परभणी – महादेव जानकर (राष्ट्रीय समाज पक्ष) पिछाडीवर – या मतदारसंघात शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे संजय जाधव २४ हजार मतांनी आघाडीवर आहेत.
- नांदेड – प्रतापराव चिखलीकर (भाजपा) – पिछाडीवर – या मतदारसंघात काँग्रेसचे वसंतराव चव्हाण ५ हजार मतांनी आघाडीवर आहेत.
- कोल्हापूर – संजय मंडलिक (शिंदे गट) पिछाडीवर – या मतदारसंघात काँग्रेस उमेदवार छत्रपती शाहू महाराज ६० हजार मतांनी आघाडीवर आहेत.
- सातारा – उदयनराजे भोसले (भाजपा) पिछाडीवर – या मतदारसंघात शरद पवार गटाचे उमेदवार शशिंकांत शिंदे ९ हजार मतांनी आघाडीवर आहेत.
- सोलापूर – राम सातपुते (भाजपा) पिछाडीवर – या मतदारसंघात काँग्रेसच्या प्रणिती शिंदे १० हजारमतांनी आघाडीवर आहेत.
- पुणे – मुरलीधर मोहोळ (भाजपा) आघाडीवर आहेत
- बारामती – सुनेत्रा पवार (अजित पवार गट) पिछाडीवर – या मतदारसंघात शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे १० हजार मतांनी आघाडीवर आहेत.
- धाराशिव – अर्चना पाटील (भाजपा) पिछाडीवर – या मतदारसंघात शिवसेनेच्या ठाकरे गटाचे ओमराजे निंबाळकर १ लाख मतांनी आघाडीवर आहेत.
- लातूर – सुधाकर श्रृंगारे (भाजपा) पिछाडीवर – या मतदारसंघात काँग्रेसचे शिवाजी काळगे ९ हजार मतांनी आघाडीवर आहेत.
- बीड – पंकजा मुंडे (भाजपा) पिछाडीवर – राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनावणे ३ हजार मतांनी आघाडीवर आहेत.
- अहमदनगर – सुजय विखे पाटील (भाजपा) आघाडीवर
- नंदुरबार – हिना गावित (भाजपा) पिछाडीवर – या मतदारसंघात काँग्रेसचे गोवाळ पाडवी ९६ हजार मतांनी आघाडीवर आहेत.
- दिंडोरी – भारती पवार (भाजपा) पिछाडीवर – या मतदारसंघात शरद पवार गटाचे भास्कर भगरे ३७ हजार मतांनी आघाडीवर आहेत.
- कल्याण – श्रीकांत शिंदे (शिंदे गट) आघाडीवर