देशात लोकसभा निवडणूक एकूण सात टप्प्यात पार पडत आहे. यापैकी चौथ्या टप्प्यातील मतदान १३ मे रोजी पार पडले. तसेच पाचव्या टप्प्यासाठी २० मे रोजी मतदान होणार आहे. या लोकसभा निवडणुकीत ८५ वर्षांवरील मतदार आणि अपंग मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी निवडणूक आयोगाने ८५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या नागरिकांसाठी आणि अपंगांसाठी ‘घरोघरी मतदान’ पर्याय उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे ८५ वर्षांवरील आणि अपंग मतदारांना मतदानाचा हक्क बजावणं सोप्प झालं आहे.
मुंबई उपनगर जिल्ह्यातील मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघाच्या १५३ दहिसर विधानसभा मतदारसंघात सोमवारी गृह मतदान पार पडले. यामध्ये १०४ वर्षाच्या लक्ष्मी राजपूत या आजीबाईंनी दहिसर पश्चिम येथे गृह मतदानाचा हक्क बजावला. तसचे ८५ वर्षांवरील अनेक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. या मतदारसंघात एकूण ६८ नोंदणीकृत ज्येष्ठ मतदार असून ते गृह मतदान करणार आहेत. यातील ६५ नोंदणीकृत पात्र मतदारांनी आज त्यांचा मतदानाचा हक्क बजावला.
हेही वाचा : अमित शाह यांचं वक्तव्य, “..तर उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी हे पक्ष फुटलेच नसते”
दरम्यान, पाचव्या टप्प्यातील निवडणुकीसाठी ८५ वर्षांवरील मतदार आणि अपंग मतदारांना १६ तारखेपर्यंत गृह मतदान करण्याची प्रक्रिया सुरू राहणार असल्याची माहिती निवडणूक अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. तसेच ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग मतदारांना मतदान करण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. मात्र. यावेळी गृह मतदान पद्धतीमुळे ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांना मतदान करणं सोप्प झालं आहे.
दरम्यान, मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी निवडणूक आयोग नेहमी प्रयत्न करत असतं. मतदारांमध्ये मतदानाची जागृती करण्यासाठी निवडणूक आयोगाकडून वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी आणि दिव्यांगांसाठीही आता घरगुती पद्धतीने मतदान करण्याचा उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे.
दरम्यान, लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव म्हणजे लोकसभेची निवडणूक मानली जाते. हा उत्सव महाराष्ट्रासह देशभरात सुरु आहे. लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा सोमवारी महाराष्ट्रासह देशभरात पार पडला. यामध्ये महाराष्ट्रात रावेर, जालना, नंदुरबार, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिर्डी, बीड, अहमदनगर या ठिकाणी मतदान झाले. आता पाचव्या टप्प्यांतील मतदान हे २० मे राजी पार पडणार आहे. तसेच या चौथ्या टप्प्याच्या निवडणुकीत देशात ६२.५६ टक्के मतदान झाले असून सर्वांधिक मतदान हे पश्चिम बंगालमध्ये झाले आहे.