Maharashtra Politics : २०१९ मधल्या ऑक्टोबर महिन्यात विधानसभा निवडणूक जाहीर झाली होती. त्यानंतर बरोबर पाच वर्षांनी म्हणजेच आज पुन्हा एकदा महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक जाहीर झाली आहे. २० नोव्हेंबरला निवडणूक होणार आहे आणि २३ नोव्हेंबरला निकाल लागणार आहे. मात्र गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्रातली राजकीय परिस्थिती ( Maharashtra Politics ) कशी बदलली? हे आपण जाणून घेणार आहोत.
२०१९ ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात पार पडली निवडणूक
२०१९ ला देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक पार पडली. त्याआधी भाजपा आणि शिवसेना यांची युती झाली होती. देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे यांची “सगळं काही समसमान होईल” आणि “आमचं ठरलंय” ही वाक्यं तेव्हा चांगलीच गाजली होती. त्यानंतर विधानसभेचे निकाल लागले. भाजपाचे १०५ आमदार निवडून आले तर शिवसेनेचे ५६ आमदार निवडून आले. आपल्या पाठिंब्याशिवाय भाजपाचा मुख्यमंत्री होत नाही हे लक्षात आल्यानंतर उद्धव ठाकरेंनी निकालाच्या पहिल्याच दिवशी सगळे पर्याय खुले असल्याचं वक्तव्य केलं आणि युतीत वादाची पहिली ठिणगी पडली. त्यानंतर महाराष्ट्रात आधी पहाटेचा शपथविधी झाला आणि नंतर महाविकास आघाडीचा प्रयोग.
२३ नोव्हेंबर २०१९ ला पहाटेचा शपथविधी
२३ नोव्हेंबर २०१९ ही तारीख महाराष्ट्र कधीही विसरु शकत नाही. कारण याच दिवशी भाजपा आणि राष्ट्रवादीची युती ( Maharashtra Politics ) महाराष्ट्राने पाहिली. देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून. राष्ट्रवादीचे आमदार फुटून अजित पवारांबरोबर आले होते. पण शरद पवारांनी सगळ्याच्या सगळ्या आमदारांना माघारी आणण्यात यश मिळवलं. पहाटेचा शपथविधी हा सगळ्यांसाठी राजकीय धक्का ठरला. पण नंतर या पहाटेच्या शपथविधीचे सगळे पदर उलगडले. यानंतर महाराष्ट्राला कधीही अपेक्षित नव्हता असा प्रयोग झाला जो होता महाविकास आघाडीचा प्रयोग.
३० नोव्हेंबर २०१९ ला उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री म्हणून शपथविधी
देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांचं सरकार गेल्यानंतर अजित पवारही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये परतले. त्यानंतर महाविकास आघाडी ( Maharashtra Politics ) म्हणजेच शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांची आघाडी तयार झाली. महाराष्ट्राच्या जनतेने जो कौल दिला होता तो या तिघांच्या बाजूने नव्हता. तसंच असं काहीतरी घडेल हे महाराष्ट्रातल्या एकाही मतदाराला वाटलं नव्हतं. पण शरद पवार आणि संजय राऊत तसंच सोनिया गांधी यांच्या पुढाकाराने महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार आलं आणि त्याचे मुख्यमंत्री होते उद्धव ठाकरे. महाराष्ट्राने ही विचित्र राजकीय परिस्थिती पहिल्यांदाच अनुभवली. पण २०१९ चा मार्च महिना उजाडला आणि देशासह राज्यात करोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे लॉकडाऊन लावावा लागला. त्यानंतर २० जून २०२२ पर्यंत राज्यात महाविकास आघाडीचं सरकार होतं.
२१ जून २०२२ ला काय घडलं?
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतलं सर्वात मोठं बंड केलं ते २१ जून २०२२ ला. एकनाथ शिंदे काही आमदारांना घेऊन बाहेर पडले. त्यांच्या बरोबर गेलेल्या आमदारांची संख्या आधी १५ त्यानंतर १८, २० असं करत करत ४० वर गेली. १० अपक्ष आमदार आणि १३ खासदारांची साथही त्यांना लाभली. उद्धव ठाकरेंनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसशी आघाडी केल्याने एकनाथ शिंदे नाराज ( Maharashtra Politics ) झाले होते. एकनाथ शिंदेंनी थेट उद्धव ठाकरेंनाच आव्हान देत दंड थोपटले आणि शिवसेनेवरच दावा सांगितला. एकनाथ शिंदेंची महाविकास आघाडीतलली नाराजी महाराष्ट्रात सर्वात मोठा पक्ष असलेल्या विरोधी पक्षाने म्हणजेच भाजपाने हेरली होती. एकनाथ शिंदेंना सगळं बळ देण्यात आलं. २९ जून २०२२ या दिवशी उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि त्यामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळलं.
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री
महाराष्ट्राच्या राजकारणात ( Maharashtra Politics ) एक नवा प्रयोग झाला तो म्हणजे एकनाथ शिंदे हे भाजपाच्या १०५ आमदारांच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री झाले. तर मी सरकारमध्ये सहभागी होणार नाही असं सांगणारे देवेंद्र फडणवीस ३० जून २०२२ च्या संध्याकाळीच उपमुख्यमंत्री झाले. देवेंद्र फडणवीस यांचे पंख कापण्याचं काम भाजपानेच केलं अशी चर्चा तेव्हा रंगली होती. उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेताना देवेंद्र फडणवीस यांच्या चेहऱ्यावरचे हावभावच खूप काही सांगून जात होते, पण दुसऱ्या दिवसापासून देवेंद्र फडणवीस कामाला लागले. महाराष्ट्राने अडीच वर्षातच महाविकास आघाडीचा प्रयोग आणि नंतर शिवसेना फुटणं अनुभवलं होतं. यानंतर काही घडेल याची कुणालाही कल्पना नव्हती. पण २ जुलै २०२३ हा दिवस महाराष्ट्रात आणखी एक राजकीय भूकंप घडवणारा ठरला.
२ जुलै २०२३ ला अजित पवार ४१ आमदारांसह महायुतीत
२ जुलै २०२३ ला अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या ४१ आमदारांसह महायुतीत ( Maharashtra Politics ) सहभागी झाले. उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतली तर छगन भुजबळ, धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील, आदिती तटकरे अशा मोजक्या नेत्यांनाही त्यांच्यासह शपथ देण्यात आली. शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्षही शिवसेनेप्रमाणेच फुटला. यावेळी शरद पवारांनाही काहीही करता आलं नाही. त्यांना गुरु मानणारा त्यांचा पुतण्या म्हणजेच अजित पवार फुटले आणि त्यांनी थेट काकांना म्हणजेच शरद पवारांनाच आव्हान दिलं. लोकसभा निवडणूक जाहीर होण्याच्या काही महिने आधीच ही घडामोड घडली. लोकसभेला बारामती मतदारसंघात सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार असा सामना पाहण्यास मिळाला. त्यात सुप्रिया सुळे प्रचंड मतांनी विजयी झाल्या. यानंतर आता महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीला सामोरा जातो आहे. आत्तापर्यंत म्हणजेच गेल्या पाच वर्षांत राजकीय घडामोडी, फोडाफोडी हे सगळं घडलं आहे.
महाराष्ट्राचा प्रवास देवेंद्र फडणवीस ते एकनाथ शिंदे व्हाया उद्धव ठाकरे
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री ते एकनाथ शिंदे मुख्यमंत्री हा प्रवास व्हाया उद्धव ठाकरे असा महाराष्ट्राने ( Maharashtra Politics ) पाहिला आहे. महाविकास आघाडीने लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातल्या ४८ पैकी ३१ जागा जिंकल्याने त्यांचा आत्मविश्वास प्रचंड वाढला आहे. तर महायुतीला अवघ्या १७ जागांवर यश मिळालं. त्यामुळे आता लाडकी बहीण योजना, सुकन्या योजना आणि इतर अनेक योजना आणून सरकारतर्फे प्रचार करण्यात आला आहे. महाराष्ट्र गमावणं ( Maharashtra Politics ) हे महायुतीला परवडणार नाही कारण भाजपाने दोन पक्ष फोडले आहेत. २०१९ ला चौरंगी लढत म्हणजेच शिवसेना, भाजपा विरुद्ध काँग्रेस आणि राष्ट्रवादी अशी होती. यंदाची म्हणजेच २०२४ ची स्थिती अशी नाही. शिवसेना (उद्धव ठाकरे), राष्ट्रवादी (शरद पवार) आणि काँग्रेस विरुद्ध भाजपा, शिवसेना (एकनाथ शिंदे), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) अशी सहा पक्षांची आहे. याच राजकारणात वंचित बहुजन आघाडी, राजू शेट्टी, संभाजीराजे आणि बच्चू कडूंची तिसरी आघाडी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या कामगिरीकडेही महाराष्ट्रातील राजकीय जाणकारांचं लक्ष आहे. दरम्यान निवडणूक जाहीर झाली आहे आता मतदार हे सगळे प्रसंग आणि अनुभव गाठीला ठेवून कुणाला मतदान करणार आणि कुणाला नाकारणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.