नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यानंतर पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीला सामोरे जाणाऱ्या राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाने विदर्भात सात उमेदवार दिले असले तरी प्रचारासाठी पक्षातील कोणताही बडा नेता या भागात फिरकला नाही. त्यामुळे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी विदर्भातील उमेदवारांना वाऱ्यावर सोडले काय, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाने विदर्भात अहेरी, अर्जुनी मोरगाव, तुमसर, पुसद, अमरावती शहर, मोर्शी आणि काटोल येथे उमेदवार उभे केले आहेत. गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगावमध्ये ऐनवेळी भाजपमधून आलेल्या माजी मंत्री राजकुमार बडोले यांना संधी दिली. अमरावती शहर मतदारसंघात काँग्रेसच्या माजी आमदार सुलभा खोडके यांना उमेदवारी देण्यात आली तर काटोल येथे अनिल शंकरराव देशमुख या एका शेतमजुराला रिंगणात उतरवण्यात आले. विशेष म्हणजे, येथे भाजपचा उमेदवार देखील मैदानात आहेत. अमरावती जिल्ह्यातील मोर्शी येथे माजी आमदार देवेंद्र भुयार यांना रिंगणात उतरवण्यात आले आहे. येथे देखील भाजप निवडणूक लढत आहे. महाविकास आघाडीत असून सुद्धा राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाने विदर्भात दोन ठिकाणी भाजप लढत असलेल्या मतदारसंघात उमेदवार दिला आहे. तर अर्जुनी मोरगाव येथे आपल्या विद्यमान आमदाराला डावलून भाजपच्या माजी मंत्र्यांना उमेदवारी दिली आहे. या पार्श्वभूमीवर पक्षातील स्टार प्रचारांनी आपल्या पक्षाच्या उमेदवारांना बळ देणे अपेक्षित होते. परंतु विदर्भात कुठेही राष्ट्रवादीच्या नेत्यांनी प्रचारसभा घेतल्या नाहीत. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी गोंदिया जिल्हा वगळता इतर प्रचार केला नाही. एकूणच या विधानससभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या (अजित पवार) स्टार प्रचारकांनी विदर्भातील उमेदवारांकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे.

हेही वाचा >>> Constituencies In Yavatmal : स्थानिक मुद्यांसह जातीय समीकरणे निर्णायक, यवतमाळमधील सातही मतदारसंघात चुरस

पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवारांना यावेळी त्यांच्या पारंपरिक मतदारसंघ बारामतीमध्ये त्यांच्याच कुटुंबातून आव्हान निर्माण झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून (शरद पवार) युगेंद्र पवार लढत आहेत. त्यामुळे अजित पवार यांना त्यांचा बराचशा वेळ बारामतीमध्ये घालवावा लागला आहे. त्या व्यतिरिक्त त्यांनी पश्चिम महाराष्ट्रातील काही मतदारसंघात प्रचारसभा घेतल्या. मात्र, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून त्यांनी निवडणूक काळात पाय देखील ठेवला नाही. शिवाय प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना देखील विदर्भात प्रचारासाठी यावे असे वाटले नाही याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या पक्षासाठी विदर्भ प्राधान्यक्रम नसल्याचे पुन्हा एकदा दिसून आले आहे, असे त्यांच्या पक्षातील नेते सांगू लागले आहेत.

राष्ट्रवादीचे (अजित पवार) विदर्भातील उमेदवार

१) अहेरी- धर्मरावबाबा आत्राम

२) अर्जुनी मोरगाव – राजकुमार बडोले

३) तुमसर – राजू कारेमोरे

४) पुसद – इंद्रनील नाईक

५) अमरावती शहर – सुलभा खोडके

६) मोर्शी – देवेंद्र भुयार

७) काटोल – अनिल शंकरराव देशमुख