Maharashtra vidhan sabha election 2024 : नुकतीच देशभरात विधानसभा निवडणूक पार पडली. २३ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे, त्यामुळे सर्वांचे लक्ष निकाल काय लागणार याकडे लागले आहे. महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना या दोन प्रमुख पक्षांमध्ये उभी फूट पडल्यामुळे राज्यात विचित्र अशी राजकीय स्थिती निर्माण झाली आहे. या दोन्ही पक्षांचे गट सत्ताधारी बाजूलाही होते आणि विरोधी बाजूलाही. गेल्या वर्षी अजित पवारांसह राष्ट्रवादीचे बहुसंख्य आमदार सत्ताधारी पक्षाच्या बाजूला गेले, त्यामुळे पक्षासह पवार कुटुंबातही फूट पडल्याचं मानलं जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडल्यानंतर महाराष्ट्रामध्ये स्टार प्रचारक म्हणून रोहित पवार चर्चेत आहेत.
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ साठी रोहित पवार यांनी २८ ऑक्टोबर रोजी कर्जत विधानसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. उमेदवारी अर्जाबरोबर जोडलेल्या शपथपत्रात रोहित पवार यांनी आपल्या मालमत्तेसह इतर बाबींची माहिती दिली आहे. याच शपथपत्रात सांगितलेल्या माहितीच्या आधारे आपण रोहित पवार यांच्याकडे एकूण मालमत्ता किती आहे, हे सविस्तर जाणून घेणार आहोत.
ब
कोण आहेत रोहित पवार?
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मगाव चौंडी, त्याभोवती फिरणारे राजकारण आणि विद्यामान आमदार शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांच्यामुळे कर्जत-जामखेड मतदारसंघ राज्यात चर्चिला जातो. गेल्या निवडणुकीप्रमाणे यंदाही कर्जत-जामखेड मतदारसंघात विद्यमान आमदार रोहित पवार व विधान परिषदेवर पुनर्वसन झालेले आमदार राम शिंदे यांच्यामध्ये थेट लढत होत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार, जे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे पणतू आहेत. रोहित पवार यांचा जन्म २९ सप्टेंबर १९८५ रोजी बारामती येथे झाला. ते पद्मश्री डॉ. आप्पासाहेब पवार यांचे नातू आहेत. रोहित यांचे वडील राजेंद्र आप्पासाहेब पवार हे एक कृषीतज्ज्ञ आहेत. त्यांनी ‘ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट’ आणि ‘बारामती ॲग्रो लिमिटेड’चे कार्य चालू ठेवले आणि उल्लेखनीय योगदान दिले. परिणामी, महाराष्ट्र राज्याने राजेंद्र पवार यांना ‘महाराष्ट्र कृषीरत्न पुरस्कार’ देऊन सन्मानित केले. रोहितची आई सुनंदा पवार, एक स्वयंनिर्मित उद्योगपती आणि सामाजिक कार्यकर्त्या आहेत, ज्यांनी महिला सक्षमीकरणासाठी प्रचंड काम केले आहे. रोहित पवार यांच्या पत्नी या अर्थतज्ज्ञ कुंती पवार आहेत आणि त्यांना आनंदिता आणि शिवांश अशी दोन मुले आहेत.
रोहित पवार यांची संपत्ती
शपथपत्रातील माहितीनुसार, रोहित पवारांकडे एकूण मालमत्ता ९१.८९ कोटी इतकी आहे. यापैकी चल संपती ४७ कोटी ९९ लाख रुपये इतकी आहे, तर अचल संपत्ती ४३ कोटी ९० लाख रुपये इतकी आहे.
रोहित पवार यांचे २०२३-२०२४ वर्षाचे उत्पन्न २२ लाख ९९ हजार ४४७ इतके आहे, तर पत्नीचे २०२३-२०२४ वर्षाचे उत्पन्न ४९ लाख ७७४ रुपये एवढे आहे; तर हिंदू अविभक्त कुटुंबातून मिळणारे २०२३-२०२४ वर्षाचे उत्पन्न १८ लाख ६९ हजार ९५४ रुपये इतके आहे.
हेही वाचा – NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?
राजकारणातील कामगिरी
रोहित पवार यांनी २०१७ मध्ये पुणे जिल्हा परिषद निवडणूक लढवली आणि विक्रमी मतांनी निवडून आले. रोहित पवार यांनी २०१९ मध्ये पहिल्यांदा अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड मतदारसंघातून पहिली विधानसभा निवडणूक लढवली होती. ही निवडणूक चर्चेत राहिली, कारण पंचवीस वर्षांपासून भाजपाचा बालेकिल्ला असलेल्या कर्जत-जामखेड मतदारसंघात रोहित पवारांनी बाजी मारली. तत्कालीन फडणवीस सरकारमधील भाजपाचे हेवीवेट मंत्री राम शिंदे यांचा ४०,००० मतांच्या फरकाने त्यांनी पराभव केला आणि भाजपाच्या बालेकिल्ल्याला तडा दिला होता.
कर्जत-जामखेडची लढत यंदाही ठरणार लक्षवेधी
महाराष्ट्रातील कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात यंदाची निवडणूक लक्षवेधी ठरणार आहे. २०१९ च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (NCP) चे रोहित पवार यांनी १,३५,८२४ मतांनी विजय मिळवला आणि भारतीय जनता पार्टी (भाजपा)चे प्रा. राम शंकर शिंदे यांचा ४३,३४७ मतांच्या फरकाने पराभव केला.
मागील निवडणुकीचे निकाल :
- २०१९ : रोहित पवार (राष्ट्रवादी) १,३५,८२४ मतांनी विजयी, प्रा. राम शंकर शिंदे (भाजपा)
- २०१४ : राम शंकर शिंदे (भाजपा) ८४, ०५८ मतांनी विजयी, खाडे रमेश भिवराव (Shivsena)
- २००९ : प्रा. राम शंकर शिंदे (भाजपा) ४३,८४५ मतांनी विजयी, देशमुख केशवराव (INC) यांचा पराभव केला.
हा मतदारसंघ अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे आणि महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यात आहे.