सातारा : २०१४ मध्ये मागितल्याशिवाय भाजपाला पाठिंबा द्यायचा नव्हता. ती केवळ एक राजकीय चाल, वक्तव्य होते. आम्हाला फक्त शिवसेना भाजपापासून वेगळी होऊ शकते का, याची चाचपणी करायची होती. त्यात आम्ही यशस्वी झालो, अशा शब्दांत शरद पवार यांनी साताऱ्यात पत्रकारांशी बोलताना भाजपासोबत जाण्याबाबत सध्या सुरू असलेल्या विविध मतमतांतरांवर भाष्य केले.
पवार म्हणाले, की त्या वेळी निकाल लागल्यावर आम्हाला भाजपाला पाठिंबा द्यायचा नव्हता. फक्त शिवसेना भाजपापासून वेगळी होऊ शकते का, आम्ही त्यांना आपण वेगळं करू शकतो का, याची चाचपणी करायची होती. त्यात आम्ही यशस्वी झालो. नंतर शिवसेना भाजपापासून वेगळी झाली आणि ते पुढे आमच्याबरोबर आल्याने आम्ही सत्ताही स्थापन करू शकलो. म्हणून त्या वेळी केलेले वक्तव्य हे राजकीय होते, असं पवार म्हणाले.
सुनील तटकरे यांनी अजित पवार यांनी प्रथम भाजपाला पाठिंबा द्यावा, तुम्ही नंतर पाठिंबा देणार असे ठरले असल्याबाबत वक्तव्य केले. त्यावर विचारले असता शरद पवार म्हणाले, की मी तसे सांगितले नव्हते. मी आजपर्यंत भाजपाला कधीही पाठिंबा दिलेला नाही. तुम्हाला ते दिसले का, असा प्रतिप्रश्न त्यांनी यावेळी पत्रकारांना केला.
हेही वाचा >>> लक्षवेधी लढत : जातीय, धार्मिक मुद्दे निर्णायक
वळसे पाटील, मुश्रीफ, मकरंद पाटील यांच्यावर टीका
हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पाटील, मकरंद पाटील यांना पाडा असं तुम्ही म्हणालात. परंतु अजित पवारांवर तुम्ही बोलला नाहीत. यावर ते म्हणाले, की मी अजून बारामतीत गेलो नाही. तेथे काय बोलणार आहे, हे तुम्हाला लवकरच कळेल. दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ आणि मकरंद पाटील हे माझ्या पक्षाच्या तिकिटावर माझ्या छायाचित्रासह भाजप उमेदवाराच्या विरोधात निवडून आले होते. जनतेने त्यांना भाजपाच्या विरोधात मत देऊन निवडून आणलं होतं. परंतु त्यांनी धोका केला आणि ते भाजपासोबत गेले. त्यांच्यासोबत हे सत्तेत असल्यामुळे मी बोललो आहे, असे पवार म्हणाले.
मोदी टीका करत नाहीत ही चिंतेची बाब’
‘व्होट जिहाद’ वर बोलताना पवार म्हणाले, की महाराष्ट्राची जनता भाजपला समर्थन देत नसल्याने ‘व्होट जिहाद’ शब्द वापरून सत्ताधारी भाजपाने महाराष्ट्रात धार्मिक ध्रुवीकरणाचा मुद्दा पुढे केला आहे. धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न या व्होट जिहादच्या माध्यमातून भाजपा सत्ताधारी पक्षाने सुरू केला असल्याची टीकाही पवार यांनी या वेळी केली. दरम्यान उलेमा संघटनेने महाविकास आघाडीकडे काही मागण्या केल्याचे पत्र आमच्या हाती आलेले नाही. त्या जर अयोग्य असतील तर मान्य होणार नाहीत, असेही पवारांनी सांगितले. मोदी माझ्यावर टीका करत नाहीत. ही माझ्यासाठी चिंतेची बाब असल्याचेही ते गमतीने म्हणाले.