Maharashtra Assembly Election 2024 Live Updates : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या राज्याच्या राजकारणात घडामोडींना वेग आला आहे. महाराष्ट्रात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना या निवडणुकीत रंगणार आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले असून सर्वच पक्षाचे उमेदवार जाहीर झाल्यानंतर काही मतदारसंघात काहीसं नाराजीचं चित्र पाहायला मिळत आहे. तसेच काही ठिकाणी बंडखोरीही झालेली पाहायला मिळत आहे. सध्या माहीम विधानसभा मतदारसंघावरून महायुतीच्या नेत्यांमध्ये खलबतं सुरु असून मनेसकडून अमित ठाकरे या मतदारसंघातून मैदानात आहेत. तसेच या ठिकाणीशिंदेंच्या शिवसेनेकडून सदा सरवणकर देखील निवडणुकीच्या मैदानात आहेत. सदा सरवणकर निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. या पार्श्वभूमीवर महायुतीत सध्या बैठकांवर बैठका सुरु आहेत. तसेच निवडणुकी संदर्भातील बातम्यांचा आढावा आणि राजकीय घडामोडी आपण लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून घेणार आहोत.

Live Updates

Maharashtra Breaking News Live Today, 02 November 2024 | महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी, ४ नोव्हेंबरला उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस, बंडखोर काय करणार?

15:43 (IST) 2 Nov 2024
“अजित पवारांना कोणी कोणी व्हिलन ठरवण्याचा प्रयत्न केला तर…”, सुनिल तटकरेंचा जयंत पाटलांना इशारा

“अजित पवारांना व्हिलन ठरवण्याचा प्रयत्न कोणी करत असेल तर मला देखील पक्षांतर्गत अनेक गोष्टी बोलता येतील. पण मला असं वाटतं की दिवाळी आणि पाडवा आहे. त्यामुळे टिका-टिप्पणी करण्यापेक्षा दिवाळीच्या शुभेच्छा दिलेल्या चांगल्या”, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना इशारा दिला आहे.

14:15 (IST) 2 Nov 2024
गोरेगावमध्ये एका ३१ मजली इमारतीला भीषण आग, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल

मुंबईच्या गोरेगावमधील सिद्धार्थ नगर परिसरातील एका ३१ मजली इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर भीषण आग लागली असल्याची माहिती समोर येत आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या असून आग विझवण्याचे प्रयत्न अग्निशमन दलाकडून सुरु असल्याची माहिती सांगण्यात येत आहे. दरम्यान, या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

13:24 (IST) 2 Nov 2024
“कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर…”, अरविंद सावंत यांच्याकडून दिलगिरी व्यक्त

शिवसेनेच्या (शिंदे) मुंबादेवी विधानसभा मतदारसंघातील उमेदवार शायना एन. सी यांच्या विरोधात आक्षेपार्ह आणि बदनामीकारक वक्तव्य केल्याप्रकरणी शिवसेनेचे (ठाकरे) खासदार अरविंद सावंत यांच्यावर टीकेची झोड उठल्यानंतर आता अरविंद सावंत यांनी आता दिलगिरी व्यक्त केली आहे. ते आज माध्यमांशी बोलत होते.

12:37 (IST) 2 Nov 2024
‘राज्यात परिवर्तन आणण्याचा निर्धार’, शरद पवारांचा महायुतीवर हल्लाबोल

विधानसभा निवडणुकीमुळे राज्याच्या राजकारणात घडामोडींना वेग आला आहे. यातच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. यासंदर्भात आज शरद पवार यांनीही भाष्य करत महायुतीवर टीका केली आहे. शरद पवार यांनी म्हटलं की, “राज्यात परिवर्तन आणण्याचा निर्धार आजच्या दिवशी करायचा आहे. आपल्याला महाराष्ट्र राज्य योग्य मार्गावर आणायचं आहे. विकास करणाऱ्यांना लोकांनी देखील सत्ता दिली पाहिजे. मग फक्त राजकारण केल्याने प्रश्न सुटत नाहीत. त्यामुळे राज्यात सत्ता परिवर्तन करायचं आहे”, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

12:03 (IST) 2 Nov 2024
लाडकी बहीण योजनेचे डिसेंबरचे पैसे कधी येणार? मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितली तारीख

“लाडकी बहीण योजनेचे पैसे आचारसंहितेत अडकले नाही, पाहिजे म्हणून नोव्हेंबरचे पैसे ऑक्टोबरमध्ये दिले. २० नोव्हेंबरला मतदान आहे. २३ नोव्हेंबरला निकाल आहे. त्यामुळे डिसेंबरचे पैसे नोव्हेंबरमध्ये येणार आहेत”, अशी महत्वाची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.

11:49 (IST) 2 Nov 2024
‘निवडणुकीनंतर ओबीसी आरक्षण थांबवलं जाणार’, प्रकाश आंबेडकरांचं मोठं विधान

“विधानसभा निवडणुकीची सुरुवात झाली आहे. ही निवडणूक महत्त्वाची आहे. ओबीसीसाठी सुद्धा ही निवडणूक महत्त्वाची आहे. कारण विधानसभेनंतर ओबीसींचं आरक्षण थांबवलं जाणार आहे. दुसऱ्या बाजूला एससीच्या आरक्षणाची अंमलबजावणी होणार आहे. त्यामुळे ही निवडणूक महत्त्वाची आहे. विधानसभेमध्ये आपले आमदार निवडून आले तर आरक्षणावरचा हा हल्ला थांबवता येईल”, असं मोठं विधान प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे.

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी

राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी अनेक उमेदवारांनी निवडणुकीचे अर्ज दाखल केलेले आहेत. मात्र, आता निवडणुकीचा अर्ज मागे घेण्यासाठी ४ तारखेला शेवटचा दिवस बाकी आहे. त्यामुळे कोणत्या पक्षाकडून कोण उमेदवार अर्ज मागे घेतात? ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.