Assembly Election Result : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालांकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. राज्यात महायुती विरूद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना पाहायला मिळत आहे. निवडणुकीच्या सुरुवातीच्या कलांमध्ये महायुतीने आघाडी घेतल्याचे पाहायला मिळत आहे. यादरम्यान राज्यात कोण सरकार स्थापन करणार आणि मुख्यमंत्री पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. यादरम्यान शिवसेना ( एकनाथ शिंदे) पक्षाचे नेते संजय निरूपम सिद्धिविनायकाच्या दर्शनाला पोहचले. तसेच त्यांनी यावेळी राज्यात महायुतीचे सरकार येणार असा दावा केला आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी मतमोजणी सुरू असतानाच मुंबईतील दिंडोशी विधानसभा हा मतदारसंघातील शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाचे उमेदवार संजय निरूपम हे सिद्धिविनायकाच्या दर्शनाला पोहचल्याचे पाहायला मिळाले.
यावेळी संजय निरूपम म्हणाले की, “आज मतमोजणीचा दिवस असून आमच्यासाठी दिवस खूप महत्वाचा आहे. नेहमीप्रमाणे सिद्धी विनायकाच्या दर्शनासाठी आलो आहे. मला विजयी करावे, याबरोबरच महाराष्ट्रात पुन्हा महायुतीचे सरकार यावे यासाठी मी सिद्धिविनायकाकडे आशीर्वाद मागीतले”, असे संजय निरूपम म्हणाले.
“राज्यात महायुतीचे सरकार येणे आवश्यक आहे, जेणेकरून राज्यात गेल्या सव्वादोन वर्षांपासून राज्यात सुरू असलेली विकासकामे, योजना सुरू राहाव्यात”, असेही निरूपम यावेळी म्हणाले.
राज्यात मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर कोण बसणार याबद्दल वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. मुख्यमंत्री पदाच्या मुद्द्यावर गेल्या काही दिवसांपासून महायुतीमध्ये रस्सीखेच सुरू असल्याचेदेखील पाहायला मिळत आहे. यादरम्यान महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? याबद्दल विचारले असता संजय निरूपम म्हणाले की, “राज्यात महायुतीचे सरकार येईल आणि महायुतीचा मुख्यमंत्री बनेल हे निश्चित आहे “.
काँग्रेस पक्षाकडून विजयी उमेदवारांसाठी हॉटेल बुकिंग केले जात आहे, याबद्दल विचारले असता निरूपम म्हणाले की, “काँग्रेसवाले जे हॉटेल बुकिंग करत आहेत, त्यांचे १२ वाजेपर्यंत हॉटेल बुकिंग रद्द होईल आणि सर्वांना आपापल्या गावी परत जावे लागेल”, असा विश्वासही संजय निरूपम यांनी व्यक्त केला.
दरम्यान यंदा महायुती दिंडोशी विधानसभेसाठी संजय निरुपम यांना उमेदवारी दिली होती. तर महाविकास आघाडीकडून सुनील वामन प्रभू यांना उमेदवारी दिली होती. या जागेवर यंदा कोण बाजी मारणार हे पाहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणूक निकालात दिंडोशीची जागा शिवसेनाचे सुनील प्रभू यांनी जिंकली होती. तर दिंडोशी मतदारसंघात विजय-पराजयाचे अंतर ४४५११ इतके होते. या निवडणुकीत शिवसेना उमेदवाराने राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार विद्या चव्हाण यांचा पराभव केला होता.