Maharashtra Assembly Election 2024 : विधानसभा निवडणुकीसाठी २२ ऑक्टोबरपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा सुटल्यानंतर आता उमेदरांकडून अर्ज भरले जात आहेत. अशाच आज २४ ऑक्टोबर रोजी गुरुपुष्यामृत योग असल्याने उमेदवारांनी आजच्या दिवसाचा मुहूर्त साधत अर्ज भरण्याला प्राधान्य दिलं आहे. सर्व राजकीय पक्षांच्या काही उमेदारांकडून आज उमेदवारी अर्ज भरले जात आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे ( शरद पवार ) आमदार तथा उमेदवार जितेंद्र आव्हाड आज शरद पवार यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यापूर्वी त्यांनी मुंब्रा येथे जोरदार शक्तीप्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला आहे. याशिवाय माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांचे सुपूत्र रोहित पाटीलदेखील निडणुकीच्या रिंगणात आहेत. रोहित पवार यांच्या उपस्थितीत ते तासगावमधून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
वरळीतून शिवसेनेच्या ठाकरे गटाचे उमेदवार आदित्य ठाकरे हेदेखील आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी आदित्य ठाकरे वरळीत रॅलीही काढली आहे. तिवसा मतदारसंघाच्या काँग्रेसच्या उमेदवार यशोमती ठाकूर आज चौथ्यांदा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यापूर्वी त्यांनी तुकडोजी महाराजांच्या समाधीस्थळी दर्शन घेत मोझरी ते तिवसा अशी बाईकरॅली काढली. यावेळीमाध्यमांशी बोलताना त्यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला.
पुण्यातील कोथरूड मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार चंद्रकांतदादा पाटीलदेखील आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यांनी कोथरूडमध्ये रॅली काढत जोरदार शक्तीप्रदर्शन केलं आहे. बीडमध्ये धनंजय मुंडे उमेदवारी अर्ज भरणार आहेत. त्यापूर्वी त्यांनी पंकजा मुंडे यांच्या घरी जात त्यांच्याकडून औक्षण करून घेतलं. भाजपाचे नेते अतुळ भातखळकर हेदेखील उमेदवारी अर्ज भरणार आहेत.
हेही वाचा – समीर भुजबळ नांदगावमधून अपक्ष निवडणूक लढवणार? छगन भुजबळांनी स्पष्टच सांगितलं; म्हणाले…
जालना मतदारसंघातून शिंदे गटाचे उमेदवार अर्जुन खोतकर उमदेवारी अर्ज दाखल करणार आहेत. तर भाजपातून राष्ट्रवादीत गेलेले हर्षवर्धन पाटील, तसेच येवल्यातून छगन भुजबळ हेदेखील आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. ठाण्यातून ठाकरे गटाचे उमेदवार राजन विचारे तसेच मनसेचे उमेदवार अविनाश जाधव आज अर्ज भरणार आहेत. त्यासाठी स्वत: राज ठाकरे उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री गुलाबराव पाटीलदेखील आज उमदेवारी अर्ज दाखल करणार आहेत.