Mahavikas Aghadi FInal Candidates List : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आजचा (२९ ऑक्टोबर) शेवटचा दिवस होता. महाविकास आघाडी व महायुतीने गेल्या काही दिवसांत अनेक उमेदवार जाहीर केले आहेत. काही ठिकाणी उमेदवार बदलले. मविआ व महायुतीमधील सर्वच पक्षांचं आज दुपारपर्यंत आपले उमेदवार जाहीर करणं चालूच होतं. मात्र, अखेरपर्यंत महायुती किंवा महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला स्पष्ट होऊ शकला नाही. मविआ नेत्यांनी ८५ – ८५ – ८५ असा फॉर्म्युला सांगितला होता खरा, मात्र तिन्ही पक्षांनी याहून अधिक उमेदवार घोषित केले. तर महायुतीने शेवटपर्यंत असा फॉर्म्युला सांगितलाच नाही. महायुतीने देखील काही जागांवर दोन दोन उमेदवार उभे केले आहेत.
गेल्या अनेक दिवसांच्या चर्चा व बैठकांनंतरही महाविकास आघाडी योग्य समन्वय साधू शकली नाही. शेवटच्या दिवसापर्यंत त्यांचे उमेदवार निश्चित झाले नव्हते. तर काही मतदारसंघांमध्ये दोन-दोन उमेदवार जाहीर केले आहेत. यांच्यापैकी काहीजण ४ नोव्हेंबरपर्यंत आपला उमेदवारी अर्ज मागे घेऊ शकतात. मात्र, सध्या तरी पाच मतदारसंघांमध्ये मविआच्या पक्षांची दोस्तीत कुस्ती पाहायला मिळू शकते.
हे ही वाचा >> महायुती व महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला! सहा पक्षांकडून इतके उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात
जागावाटपात सावळागोंधळ
महाविकास आघाडीच्या जागावाटपातही सावळागोंधळ पाहायला मिळाला. मविआच्या जागावाटपात काँग्रेस मोठा भाऊ ठरला आहे. लोकसभा निवडणुकीतील अनपेक्षित यशानंतर काँग्रेसचा आत्मविश्वास वाढला आहे. परिणामी, त्यांनी मविआच्या जागावाटपात सर्वाधिक जागा आपल्याकडे खेचल्या असून त्यांनी राज्यात तब्बल १०४ उमेदवार दिले आहेत. त्यापाठोपाठ उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने ९० जागांवर आपले उमेदवार जाहीर केले आहेत. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने ८७ उमेदवार दिले आहेत. मविआने राज्यातील एकूण २७६ जागांवर २८१ उमेदवार दिले आहेत. पाच मतदारसंघांमध्ये मविआचेच दोन उमेदवार एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. इतर ११ मतदारसंघांमध्ये त्यांनी उमेदवार दिले आहेत की नाही, किंवा या जागांवर त्यांच्या मित्रपक्षांचा उमेदवार आहे का? हे कळू शकलेलं नाही.
हे ही वाचा >> शिवसेना शिंदे गटाचा अजित पवार गटाला धक्का, हेलिकॉप्टरमधून एबी अर्ज आणून देवळाली, दिंडोरीत बंडखोरी
पंढरपूर
काँग्रेस – भगिरथ भालके
राष्ट्रवादी (शरद पवार) – अनिल सावंत
सांगोला
शिवसेना (ठाकरे) – दीपक आबा साळुंखे
शेकाप – बाबासाहेब देशमुख
दक्षिण सोलापूर
काँग्रेस – दिलीप माने
शिवसेना (ठाकरे) – अमर पाटील
परांडा
शिवसेना (ठाकरे) – रणजीत पाटील
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) – राहुल मोटे
दिग्रस
शिवसेना (ठाकरे) – पवन जैस्वाल
काँग्रेस – माणिकराव ठाकरे