Mahayuti : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे निकाल २३ नोव्हेंबरला लागले आहेत. त्यानंतर पाच दिवस उलटूनही मुख्यमंत्री कोण होणार याचा सस्पेन्स कायम आहे. महायुतीच्या ( Mahayuti ) दिल्लीतल्या बैठकीत महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? हे ठरण्याची आणि ते नाव समोर येण्याची शक्यता आहे. विधासभा निवडणुकीचा निकाल लागून चार दिवस झाले आहेत तरीही मुख्यमंत्री कोण होणार हे स्पष्ट झालेलं नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एकनाथ शिंदेंनी मोदी-शाह यांना दिले निर्णय घेण्याचे अधिकार

महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातल्या त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत मोदी आणि अमित शाह हे जो निर्णय घेतील तो मान्य असेल. जे नाव जाहीर केलं जाईल त्या नावाला शिवसेना म्हणून आमचा पाठिंबा असेल असं जाहीर केलं आहे. तसंच कुठल्याही पदापेक्षा लाडक्या बहिणींचा सख्खा लाडका भाऊ ही ओळख खूप मोठी आहे असंही वक्तव्य एकनाथ शिंदेंनी केलं आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीतून माघार घेतल्याची चर्चा आहे. दुसरीकडे भाजपाने आणि संघाने देवेंद्र फडणवीस यांचं नाव महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून निश्चित केल्याचं कळतं आहे. मात्र याबाबत पक्षाने अधिकृत भूमिका जाहीर केलेली नाही.

महायुतीच्या नेत्यांची दिल्लीत बैठक

महायुतीचे ( Mahayuti ) प्रमुख नेते म्हणजेच देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची दिल्लीत गृहमंत्री अमित शाह यांच्यासह बैठक होणार आहे. महायुतीला ( Mahayuti ) २३९ जागा मिळाल्या आहेत. त्यापैकी भाजपाला १३२, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला ५७ आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला ४१ जागा मिळाल्या आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपाला सलग तिसऱ्यांदा १०० च्या वर जागा मिळवण्यात यश आलं आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनाच मुख्यमंत्री केलं जाईल हे जवळपास निश्चित मानलं जातं आहे. मात्र याबाबतची घोषणा अद्याप झालेली नाही

अजित पवारांनी नेमकं काय सांगितलं?

महायुतीतले ( Mahayuti ) प्रमुख नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी माध्यमांना हे सांगितलं की ३० नोव्हेंबर किंवा १ डिसेंबर या दोन दिवशी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडेल. एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री असा फॉर्म्युला नव्या सरकारमध्ये असेल असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे. इंडिया टुडेने याबाबतचं वृत्त दिलं आहे. या सगळ्या गोष्टी असल्या तरीही नेमकं कुणाचं नाव जाहीर केलं जाणार हा सस्पेन्स कायम आहे.

मराठीतील सर्व निवडणूक २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mahayuti leaders big delhi meet today suspense over cm post of maharashtra continues scj