धुळे लोकसभा मतदारसंघाच्या काँग्रेसच्या उमेदवार शोभा बच्छाव यांच्या प्रचारासाठी आज काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आज धुळ्यात आले होते. यावेळी जाहीर सभेत बोलताना मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रदान नरेंद्र मोदी, आरएसएस, भाजपा, अशोक चव्हाण, अजित पवार, एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला. महाराष्ट्र ही मर्दांची भूमी आहे. मात्र, एकनाथ शिंदे, अशोक चव्हाण आणि अजित पवार यांनी त्यांच्यासमोर (भाजपा) साष्टांग नमस्कार घातला, अशी खोचक टीका मल्लिकार्जुन खरगे यांनी केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मल्लिकार्जुन खरगे काय म्हणाले?

“ही निवडणूक छोटी निवडणूक नाही. देशाच्या भविष्याची निवडणूक आहे. देशाचे भविष्य बनवण्यासाठी संविधान वाचवण्याचं काम आपलं आहे. लोकशाही टिकवणं गरजेचं आहे. लोकशाही राहिली नाही तर आपण राहणार नाही. भाजपा आणि आरएसएस संविधान संपवण्यासाठी लढत आहे. २०२४ च्या निवडणुकीनंतर भाजपाला आणि नरेंद्र मोदी यांना काय हवं आहे? ४०० पार करून त्यांना संविधान बदलाचं आहे. मात्र, ४०० पार करण्याचं त्यांच्या हातात नाही. तुमचा-आमचा मालक ही जनता आहे. त्यामुळे ४०० पार हे जनता ठरवेल”, असे टीकास्त्र मल्लिकार्जुन खरगे यांनी सोडले.

हेही वाचा : “एकनाथ शिंदेंना अपमानित करायचे नव्हते, म्हणून…”, ठाणे लोकसभेवरून देवेंद्र फडणवीस यांचं मोठं विधान

“नरेंद्र मोदी हे १५ लाख देणार म्हणाले होते. त्याचे पुढे काय झाले? मोदी हे खोटे बोलतात. आता मोदी म्हणतात आम्हाला देशाला मजबूत करायचं आहे. हे देशाला मजबूत करत नाहीत तर मोदी सरकारने आतापर्यंत ईडी आणि सीबीआयच्या केस टाकून ८०० नेत्यांना जेलमध्ये टाकले आहे. ईडीचे संकट टाळण्यासाठी विरोधी पक्षातील नेत्यांना धमकावलं जात आहे. महाराष्ट्रात खासदार अशोक चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यासमोर साष्टांग नमस्कार घातला. त्यामुळे लोकांनाही लाज वाटली. मात्र, महाराष्ट्र ही मर्दांची भूमी आहे”, अशी खोचक टीका मल्लिकार्जुन खरगे यांनी केली.

“नरेंद्र मोदी यांची हिंमत असेल तर मुकेश अंबानी, गौतम अदानी यांच्यावर ईडी आणि सीबीआय, आयकरची रेड टाकावी. तेव्हा देशाला कळेल की खरं कोण आहे. देशात सध्या एवढी महागाई वाढली आहे की, गरीबांचे हाल होत आहेत. एकीकडे महागाई वाढत आहे. दुसरीकडे नोकरी मिळत नाही. अशी सध्याची अवस्था आहे. त्यामुळे आपल्या सर्वांना एक होऊन काम करायचं आहे”, असा हल्लाबोल मल्लिकार्जुन खरगे यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर केला.

मराठीतील सर्व निवडणूक २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mallikarjun kharge criticism to ajit pawar eknath shinde ashok chavan rss narendra modi gkt