मणिपूर विधानसभा निवडणुकीत यावेळी रंजक स्थिती निर्माण झाली आहे. युतीचं सरकार स्थापन करण्यात महत्वाची भूमिका निभावणाऱ्या नॅशनल पिपल्स पार्टीने (एनपीपीप) भाजपाला सत्तेवरुन हटवण्यासाठी मोहीमच सुरु केली आहे. पक्षाचे प्रमुख आणि मेघालयचे मुख्यमंत्री कोनराड संगमा चार दिवसांपासून येथे ठाण मांडून बसले आहेत. गेल्या वेळी त्यांनी नऊ जागांवर निवडणूक लढवली होती, मात्र यावेळी विधानसभेच्या एकूण ६० ते ४२ जागांवर दावा केला आहे.
भाजपा नेते चिदानंद यांनी तर एनपीपीचं अस्तित्व राज्यातून संपवू असा इशाराच दिला आहे. तर काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष हेमचंद्र यांनी एनपीपीला आपला मित्रपक्ष म्हणून जाहीर केलं आहे.
एनपीपीने २०१७ च्या निवडणुकीत मणिपूरमध्ये चार जागा जिंकत भाजपाच्या नेतृत्वातील सरकार स्थापन करण्यात महत्वाची भूमिका निभावली होती. कोनराड संगमा यांनी यावेळी मणिपूरमध्ये सर्वांना आश्चर्याचा धक्का देणारा विजय मिळवण्याचा तसंच एनपीपीच्या नेतृत्वात सरकार स्थापन होईल असा विश्वास व्यक्त केला आहे. राज्यात एनपीपीशिवाय सरकार स्थापन होऊ शकत नाही असा दावाच त्यांनी केला आहे.
त्यांनी भाजपातून नाराज होऊन आलेल्या १९ जणांना तिकीट दिलं आहे. भाजपा युतीसोबतच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री युन्नम जयकुमार एनपीपीचे आहेत. पक्षाचे संभावित मुख्यमंत्री चेहऱ्यांनीही भाजपाला सोडचिठ्ठी दिली आहे. यावेळी त्यांच्याकडून भाजपावर जोरदार टीका केली जात आहे. कोनराड संगमा मणिपूरमध्ये एनपीपीची ताकद वाढवण्यासाठी संपूर्ण प्रयत्न करत आहेत.
भाजपा नेतृत्वाने मात्र ते स्वप्न पाहत असल्याचं म्हटलं आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, मणिपूरमध्ये भाजपाला पर्याय म्हणून समोर येण्याचा प्रयत्न करत आहे. हा पक्ष फक्त निवडणुका असल्यावर समोर येतो अशी टीका त्यांनी केली असून विजयाचा दावा केला आहे.
भाजपा आणि एनपीपीमध्ये वाद सुरु असताना काँग्रेसही दुसरीकडे मैदानात आहे. काँग्रेसने भाजपाच्या यादीत सहभागी न होऊ शकलेल्या १६ पैकी १० आमदारांना तिकीट दिलं आहे. सोबतच एनपीपीला मित्रपक्ष म्हणत खळबळ निर्माण केली आहे. राज्यसभा निवडणुकीत आम्ही एकत्र मिळून काम केलं होतं, त्यामुळे तत्वत: आम्ही एनपीपीसोबत आहोत असं हेमोचंद्र म्हणाले आहेत.