Manisha Waikar Demands Recounting : राज्यात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड मोठा विजय मिळाला. असे असले तरी, यामध्ये महायुतीतील काही दिग्गज उमेदवारांना पराभवाचा सामनाही करावा लागला. या पराभूत झालेल्या उमेदवारांमध्ये शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) खासदार रवींद्र वायकर यांच्या पत्नी मनीषा वायकर यांचाही समावेश आहे. मुंबईतील जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघातून मनीषा वायकर यांचा सुमारे १५०० मतांनी पराभव झाला. या पराभवानंतर मनीषा वायकर फेर मतमोजणीसाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहेत.
काय म्हणाल्या मनिषा वायकर?
या सर्व प्रकरणावर बोलताना शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे) उमेदवार मनीषा वायकर म्हणाल्या, “मतमोजणीच्या दिवशी निकाल जाहीर झाल्यानंतर फेरमतमोजणी व्हावी यासाठी आमचे प्रतिनिधी अर्ज घेऊन गेले होते, पण पोलिसांनी त्यांना प्रवेशद्वारावरच एक तासभर रोखून धरले होते. त्यामुळे फेरमतमोजणीचा अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांपर्यंत वेळेत पोहचला नाही.”
लोकसभा निवडणुकीत काय घडलं होतं?
दरम्यान लोकसभा निवडणुकीमध्ये मुंबईतील उत्तर पश्चिम मतदारसंघाच्या निकालावेळी मनीषा वायकर यांचे पती आणि शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) उमेदवार रवींद्र वायकर यांना ४८ मतांनी विजयी घोषित करण्यात आले होते. पण शिवसेना (उद्धव ठाकरे) उमेदवार अमोल किर्तीकर यांनी फेरमतमोजणीची मागणी केल्यानंतर किर्तीकर १ मताने पुढे असल्याचे सांगण्यात आले होते. तेव्हा वायकरांनीही फेरमतमोजणीची मागणी केल्यानंतर वायकरांना ४८ मतांनी विजयी घोषीत करण्यात आले होते. रवींद्र वायकर यांना विजयी घोषित केल्यानंतर शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) उमेदवार अमोल किर्तीकर यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.
जोगेश्वरी पूर्वचा निकाल
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे (एकानथ शिंदे) रवींद्र वायकर जोगेश्वरी पूर्व मतदारसंघातून विजयी झाले होते. त्यानंतर सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत ते मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून विजय झाले. आता शिसेनेने (एकनाथ शिंदे) वायकर यांच्या पत्नी मनीषा वायकर यांना उमेदवारी दिली होती. मनीषा वायकर यांच्यासमोर यावेळी अनंत (बाळा) नर यांचे आव्हान होते. यामध्ये अनंत (बाळा) नर यांनी ७७०४४ मते मिळवत मनीषा वायकर यांचा १५४१ मतांनी पराभव केला.
दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणी दिवशी निकाल जाहीर करण्यापूर्वी फेरमतमोजणी करावी यासाठी मनीषा वायकर यांनी मागणी केली होती. पण पोलिसांनी त्यांच्या प्रतिनिधींची अडवणूक केल्याने त्यांना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यापर्यंत फेरमतमोजणीचा अर्ज पोहचवता आला नसल्याचा दावा त्यांनी केला आहे.