Manoj Jarange On Assembly Elections 2024 : राज्यात गेल्या काही महिन्यांपासून मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा चर्चेत आहे. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याची मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केलेली आहे. यासाठी त्यांनी अनेकवेळा उपोषण आणि आंदोलनही केलं. मात्र, राज्य सरकारने त्यांच्या मागणीसंदर्भात अद्याप कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही. यातच आता राज्यात विधानसभेची निवडणूक जाहीर झालेली आहे. त्यामुळे राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. यातच मनोज जरांगे पाटील यांनी आज (२० ऑक्टोबर) अंतरवाली सराटीमध्ये मराठा समाजाची महत्त्वाची बैठक बोलावली होती. या बैठकीत मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीत उमेदवार उभे करायचे की नाही? यासंदर्भात मोठी घोषणा केली आहे.
विधानसभेच्या निवडणुकीत उमेदवार उभे करायचे की नाही? याबाबतचा कौल मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला विचारत त्यांचं मत जाणून घेतलं. त्यानंतर मनोज जरांगे यांनी मोठी घोषणा केली. ‘ज्या ठिकाणी आपले उमेदवार निवडून येतील त्या ठिकाणी उमेदवार द्यायचे. तसेच जो मतदारसंघ राखीव असेल त्या ठिकाणी जर उमेदवार आपल्या विचाराचा असेल मग तो उमेदवार कोणत्या पक्षाचा असेल तरीही त्या उमेदवाराला आपण मदत करायची. मग त्या ठिकाणी आपण उमेदवार उभा करायचा नाही. मात्र, त्या उमेदवाराकडून ५०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर आपल्याला पाठिंबा देईल असं लिहून घ्यायचं’, अशी घोषणा मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी जाहीर केली आहे.
हेही वाचा : Chhagan Bhujbal : समीर भुजबळ मविआच्या वाटेवर? ठाकरेंच्या तिकीटावर विधानसभा लढणार? छगन भुजबळ म्हणाले…
“आपला उमेदवार कोणत्या मतदारसंघामधून निवडून येऊ शकतो? तसेच कोणत्या मतदारसंघात मुस्लिम-दलीत एकत्र आहेत, ते देखील आपण पाहणार आहोत. मात्र, तुम्ही तोपर्यंत उमेदवारी अर्ज भरा, अर्ज मागे घ्यायच्या दिवशी मी तुम्हाला सांगेल की कोणत्या मतदारसंघामधून कोणाचा अर्ज ठेवायचा? आणि कोणाचा अर्ज मागे घ्यायचा? हे सांगेल. पण तुम्ही आता उमेदवारी अर्ज भरा. मी बरोबर समीकरण जुळवतो”, असं म्हणत मनोज जरांगे यांनी विधानसभा निवडणुकीत उमेदवार (Assembly Elections 2024 ) उतरवण्याची मोठी घोषणा केली आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी सरकारकडे करत आहेत. मात्र, त्यांची मागणी सरकारने मान्य न केल्याने मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीत उमेदवार उभे करण्याचा इशारा दिला होता. तसेच सत्ताधाऱ्यांचे आमदार निवडणुकीत पाडणार असल्याचाही इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला होता. त्यानंतर आज अखेर मनोज जरांगे यांनी विधानसभा निवडणुकीत उमेदवार उतरवण्याची घोषणा केली आहे. दरम्यान, यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी बैठकीत मराठा समाजाला हात वर करुन निवडणुकीमध्ये उमेदवार उतरायचे की नाही? असं विचारत त्यांचं मत जाणून घेतलं आणि त्यानंतर उमेदवार निवडणुकीत उभे करण्याचा निर्णय घेण्यात आला.