उत्तर प्रदेशमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान १२ दिवसांवर येऊन ठेपलेलं असताना राजकीय आरोप-प्रत्यारोप आणि प्रचाराची रणधुमाळी शिगेला पोहोचली आहे. सात टप्प्यांमध्ये होणाऱ्या या निवडणुकीत भाजपा आणि काँग्रेससोबतच सपा आणि बसपा या पक्षांनीही कंबर कसली आहे. मात्र, ही निवडणूक अधिक रंगतदार होण्यासाठी असदुद्दीन ओवैसी यांच्या एमआयएम पक्षानं देखील १०० ठिकाणी उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर असदुद्दीन ओवैसी यांनी भाजपा आणि सपाच्या राजकारणावर टीका केली आहे.
ओवैसींनी भागीदारी संकल्प मोर्चाच्या नावाने आघाडीमध्ये निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. ही आघाडी उत्तर प्रदेशमधील सर्व ४०३ जागा लढवणार असून त्यातील १०० जागांवर ओवासींनी एमआयएमचे उमेदवार उभे करणार असल्याचं जाहीर केलं आहे. तसेच, ओवैसींनी आत्ताच त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराची घोषणा केली असून नव्या सरकारमध्ये अडीच-अडीच वर्षासाठी मुख्यमंत्री आणि तीन उपमुख्यंत्री असतील, असं देखील जाहीर केलं आहे.
ओवेसींची उत्तर प्रदेशात हिंदूंना उमेदवारी : काय आहे ही व्यूहरचना?
अखिलेश यादव, योगी आदित्यनाथांवर टीका
“ते एका मंदिराविषयी बोलतात, तर हे दुसऱ्या मंदिराविषयी बोलतात. तुम्ही अल्पसंख्याक समाज, मागास समाजाविषयी बोला. तुम्ही त्यांना न्याय देण्याविषयी बोलत नाहीत. हा सगळा लढा योगी आदित्यनाथ मोठे हिंदू आहेत की अखिलेश यादव मोठे हिंदू आहेत असा आहे. या दोघांमध्येही मोदींपेक्षा मोठा हिंदू कोण होईल? असा वाद सुरू आहे. सामाजिक न्यायाची लढाई कुठे होतेय?” असा सवाल ओवैसींनी उपस्थित केला आहे.
दरम्यान, भागीदारी संकल्प मोर्चा विजयी झाल्यास पहिली अडीच वर्ष बाबू सिंह कुशवाह मुख्यमंत्री असतील, तर पुढची अडीच वर्ष दलित मुख्यमंत्री असतील. त्याशिवाय, तीन उपमुख्यमंत्री सरकारमध्ये असतील, त्यातले एक उपमुख्यमंत्री मुस्लीम तर इतर दोन मुख्यमंत्री मागास समाजाचे असतील, असं देखील ओवैसी यांनी जाहीर केलं आहे.