Mira Bhayandar Assembly Election 2024 : २००९ मध्ये मतदारसंघांच्या पुनर्ररचनेनंतर पहिल्यांदाच मीरा-भाईंदर विधानसभा मतदारसंघ अस्तित्वात आला. त्या वेळी राष्ट्रवादीचे गिल्बर्ट मेन्डोन्सा आमदार म्हणून निवडून आले. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने मतदारसंघ मिळविण्यासाठी प्रयत्न केले. मात्र राष्ट्रवादीने हा मतदारसंघ सोडण्यास ठाम नकार दिला. परंतु या निवडणुकीत मेन्डोन्सा यांचा पराभव झाला आणि त्यांच्या जागी भाजपाचे नरेंद्र मेहता विजयी झाले. गेल्या पाच वर्षांच्या कालावधीत येथील राजकीय समीकरणात मोठ्या प्रमाणावर उलथापालथ झाली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

देशात भाजपाची लाट आल्यानंतर २०१७ मध्ये झालेल्या पालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांसह पक्षाच्या बहुतांश नगरसेवकांनी भाजपा आणि शिवसेनेची वाट धरली. पाठोपाठ राष्ट्रवादीचे मीरा-भाईंदरमधील सर्वेसर्वा गिल्बर्ट मेन्डोन्साही शिवसेनेत डेरेदाखल झाले. याचा परिणाम म्हणून मीरा-भाईंदर महानगरपालिकेतील राष्ट्रवादीचे अस्तित्वच संपुष्टात आले. त्यांचा एकही नगरसेवक निवडून आला नाही. काँग्रेसचे मात्र १२ नगरसेवक निवडून आले. सध्या राष्ट्रवादीची ताकद मीरा-भाईंदरमध्ये अतिशय नाजूक आहे. तर, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत गीता भरत जैन या अपक्ष उमेदवार निवडून आल्या. म्हणजे गेल्या १५ वर्षांत इथं कोणाही एका पक्षाचं वर्चस्व राहिलेलं नाही. त्यामुळे आगामी निवडणुकीतही इथं कडवी झुंज पाहायला मिळणार आहे.

हेही वाचा >> Dombivli Assembly Constituency : भाजपाच्या बालेकिल्ल्यात महाविकास आघाडी सुरुंग लावणार का? डोंंबिवलीत बहुरंगी लढतीची शक्यता!

तर, दुसरीकडे नरेंद्र मेहता हेच भाजपाचे उमेदवार असतील अशी घोषणा कार्यकर्ता मेळाव्यात करण्यात आली आहे. नरेंद्र मेहता यांचा गीता जैन यांनी पराभव केल्याने पुन्हा त्यांनाच उमेदवारी दिल्याने भाजपातील पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. २०१९ च्या निवडणुकीत भाजपामधून बंडखोरी करत मेहता यांचा पराभव करणाऱ्या अपक्ष आमदार गीता जैन यांनी देखील यंदा भाजपा पक्षातूनच या जागेवर आपला दावा केला आहे. तर माजी जिल्हाध्यक्ष रवी व्यास यांनी पक्षात स्वतंत्र गट तयार करून मेहता यांना जाहीर आव्हान दिले आहे. त्यामुळे वरिष्ठ पातळीवर काय निर्णय होतो याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा >> Mira Bhayandar Vidhan Sabha Constituency : मीरा-भाईंदरची भाजपाची उमेदवारी अखेर नरेंद्र मेहतांनाच, मुख्यमंत्र्यांच्या सहयोगी आमदार गीता जैन एकाकी

गीता जैन आणि नरेंद्र मेहता यांच्यात कडवी झुंज

२०१९ च्या निवडणुकीत गीता जैन यांना ७९ हजार ५२७ मते मिळाली होती. तर, नरेंद्र मेहता यांना ६३ हजार ९९२ मते मिळाली. राष्ट्रवादीचे सय्यद मुझ्झफ्फर हुसेन यांना ५५ हजार ८९९ मते मिळाली होती. मनसेच्या हरेश सुतार यांनी ३ हजार ९२९ मते मिळवली होती. म्हणजेच, अपक्ष, भाजपा आणि राष्ट्रवादीत अटीतटीची लढत झाली होती. हीच लढत आता २०२४ च्या निवडणुकीतही पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

मीरा भाईंदर विधानसभा मतदारसंघाच्या मतदार यादीनुसार ४ लाख ३९ हजार २८३ मतदार आहेत. त्यात २ लाख ५ हजार ६२५ महिला मतदार तर २ लाख ३३ हजार २८३ पुरुष मतदारांची संख्या आहे. तर ४ तृतीयपंथी मतदार आहेत.

पुन्हा मेहता विरुद्ध जैन लढत

बहुचर्चचित मिरा भाईंदर मतदार संघातून गीता जैन की नरेंद्र मेहता या वादात अखेर नरेंद्र मेहता यांनी बाजी मारली आहे. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपाने विद्यमान आमदार गीता जैन यांना डावलून नरेंद्र मेहता यांना उमेदवारी जाहीर केली. संतप्त आमदार गीता जैन पुन्हा अपक्ष निवडणूक लढवून भाजप आणि मेहता धूळ चरण्याचा निर्धार केला आहे. नरेंद्र मेहता यांच्या उमेदवारीसाठी भाजपचे प्रभावी नेते रवींद्र चव्हाण आग्रही होते. तर, महाविकास आघाडीकडून काँग्रेस पक्षाच्या वतीने मुजफ्फर हुसेन यांना उमेदवारी मिळाली आहे.

भाजपा उमेदवाराच्या प्रचारसभेसाठी योगी आदित्यनाथ

नरेंद्र मेहता यांच्या प्रचारासाठी थेट राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा मीरा भाईंदरमध्ये आले होते. तर, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही मीरा भाईंदरमध्ये जाहीर सभा घेतली. तर, फक्त मतदार आणि समर्थकांच्या जीवावर गीता जैन यांनी येथील प्रचारसभा आणि रॅली दुमदुमून ठेवली.

ताजी अपडेट

विधानसभा निवडणुकीत नरेंद्र मेहता आणि गीता जैन अशी थेट लढत झाल्याने हा मतदारसंघ कोण काबिज करणार आहे याकडे सर्वांचं लक्ष आहे. हा मतदारसंघ ठाणे जिल्ह्यात मोडतो. या जिल्ह्यात एकूण ५६.५ टक्के मतदान झालं आहे.

नवीन अपडेट

मीरा भाईंदर विधानसभा मतदारसंघात भाजपाच्या नरेंद्र मेहता यांचा विजय झाला असून राष्ट्रवादीच्या मुझ्झफ्फ हुसेन आणि अपक्ष गीता जैन यांचा ६० हजार ४३३ च्या मताधिक्क्याने पराभव झाला आहे.

मराठीतील सर्व निवडणूक २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mira bhayandar vidhan sabha constituency 2024 bitter fight in independent mlas constituency will bjp beat or will mahavikas aghadi get a chance sgk