मिझोराम विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. याबाबतचा सुरुवातीचा कौल हाती आला असून यामध्ये झोरम पीपल्स मूव्हमेंट पक्षाने जोरदार मुसंडी मारली आहे. आतापर्यंत झेडपीएमने ११ जागांवर विजय संपादन केला असून १५ जागांवर आघाडी घेतली आहे. तर मिझो नॅशनल फ्रन्टने १० जागांवर आघाडी घेतली आहे, तर एका जागेवर विजय मिळवला आहे. ४० सदस्य संख्या असणाऱ्या मिझोराममध्ये झेडपीएमने विजयी आघाडी घेतली असून सत्तांतर होणं जवळपास निश्चित समजलं जात आहे.
सुरुवातीचा कौल समोर आल्यानंतर झेडपीएमचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार लालदुहोमा आणि आयझॉल वेस्ट २ चे उमेदवार लालनघिंगलोवा हमार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. झेडपीएमचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार लालदुहोमा म्हणाले, “मतमोजणीत सुरुवातीला मिळालेल्या यशाचं मला आश्चर्य वाटत नाही. मला जे अपेक्षित होतं, त्याप्रमाणेच निकाल समोर येत आहेत. पूर्ण निकाल हाती येऊ द्या. अद्याप मतमोजणी प्रक्रिया सुरू आहे.”
दुसरीकडे, आयझॉल वेस्ट २ चे झेडपीएम (झोरम पीपल्स मूव्हमेंट) पक्षाचे उमेदवार लालनघिंगलोवा हमार म्हणाले, “मतमोजणीच्या पहिल्या फेरीअखेर मी सुमारे दोन हजार मतांनी आघाडी घेतली आहे. हे माझ्यासाठी सुरक्षित असल्याचं दिसत आहे. पण दुसऱ्या फेरीत काहीही होऊ शकतं. पण मला आशा आहे की, मी माझ्या मतदारसंघात नक्की विजयी होईल. झेडपीएम पक्षाला राज्यात किमान २५ जागा मिळतील, असा अंदाज मी मतदानाच्या दिवशी वर्तवला होता. तो आता खरा ठरताना दिसत आहे. आमच्या पक्षाने बहुमताचा आकडा गाठल्याचं दिसत आहे.”