राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते आणि इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांचा एक व्हिडीओ ट्विट करत गंभीर आरोप केले. दत्तात्रय भरणे यांचा एक व्हिडीओ शेअर करत दत्तात्रय भरणे यांच्यावर टीका केली होती. तसेच त्यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये दत्तात्रय भरणे हे शरद पवार गटाच्या एका कार्यकर्त्याला शिवीगाळ करत असल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला होता. रोहित पवार यांच्या या आरोपावर आणि त्या व्हिडीओबाबत दत्तात्रय भरणे यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
दत्तात्रय भरणे काय म्हणाले?
“मी गावात फिरत असताना मला कार्यकर्त्यांची गर्दी दिसली. बूथच्या बाहेरचा हा विषय होता. बूथच्या बाहेर एका कारखान्याचा कर्मचारी लोकांना दमदाटी करत होता. तसेच त्याने माझ्या आधी पैशाचे वाटप केले होते. मी त्या ठिकाणी गेलो. मात्र, त्याच्या आधी लक्षात आले नाही. त्याने माझ्याबाबत थोडा अपशब्द वापरला. त्यानंतर मी त्याला तेथून जायला सांगिलते. तो निवडणुकीचा विषय नव्हता. तो कार्यकर्ता चुकला होता. तो कार्यकर्ता नव्हता तर बारामती अॅग्रोचा कर्मचारी होता. मी त्या ठिकाणी गेलो नसतो तर त्याला लोकांनी मारहाण केली असती. मात्र, मी त्याला वाचवले आहे”, असे स्पष्टीकरण दत्तात्रय भरणे यांनी दिले आहे.
हेही वाचा : रोहित पवारांचा अजित पवारांना टोला; म्हणाले, “निवडणुकीच्या दिवशी आई कुणाला आठवत असेल तर…”
“मी आमदार जरी असलो तरी मला भावना आहेत. आपण पाच वर्ष काम करतो. लोकांना मदत करता येईल तेवडी करत असतो. लोकांचे काम करतो, विकासाचे काम करत असतो. मात्र, अशा प्रकारे कोणीतरी येऊन पैशाचे वाटप करायचे, गावामध्ये येवून दादागिरी करायची, आमदाराबाबत अर्वाच्च भाषा वापरायची? मी कुठेही आरेरावी केलेली नाही. ही निवडणूक आहे, त्यामुळे आरोप होत असतात. त्यांनी तो व्हिडीओ काढला कारण त्याला ते करायचे असेल. पण आम्हीही व्हिडीओ काढू शकलो असतो. यावर आपण कुठेही तक्रार करणार नसून याबाबत जर मला नोटीस आली तर योग्य ते कायदेशीर उत्तर देण्यात येईल”, असे दत्तात्रय भरणे यांनी म्हटले. ते टिव्ही ९ शी बोलत होते.
दत्तात्रय भरणे यांच्याविरोधात तक्रार
दत्तात्रय भरणे यांनी कार्यकर्त्याला शिवीगाळ केल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला. यानंतर आता सुप्रिया सुळे यांनी आमदार दत्तात्रय भरणे यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे आता राजकारण आणखी तापण्याची शक्यता आहे. दत्तात्रय भरणे हे गावातील लोकांना शिवीगाळ करून धमकावत असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.