मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज ठाण्यात सभा पार पडणार आहे. राज ठाकरेंनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला आहे. त्यानंतर पहिल्यांदाच ते ठाण्यात सभा घेणार आहेत. ठाण्याला अगदीच लागून असलेल्या कळवा या ठिकाणी ही सभा होते आहे. या सभेसाठी कल्याण डोंबिवलीचे मनसैनिक, शिवसैनिक सगळे कळव्यात दाखल होत आहेत. राज ठाकरेंच्या या सभेबाबत आमदार राजू पाटील यांनी मोठं वक्तव्य केलं आहे जे चर्चेत आहे. ठाणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार नरेश म्हस्के आणि कल्याण मतदारसंघाचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारासाठी ही सभा असणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय म्हणाले राजू पाटील?

राज ठाकरेंच्या सभेची तयारी पूर्ण झाली आहे. आम्ही तिथे जाऊन आता पाहणीही केली आहे. राज ठाकरेंची सभा ही आम्हा सगळ्यांसाठीच पर्वणी असते. मराठी माणूस राज ठाकरेंना धनुष्यबाण चिन्ह असलेल्या मंचावर बघण्यासाठी उत्सुक आहे. राज ठाकरे हे बाळासाहेब ठाकरेंचं प्रतिरुप आहेत असं आम्ही मानतो. ठाकरेंनी हिंदुत्वाबरोबर असावं ही इच्छा पूर्ण होणार आहे त्यामुळे आम्ही आनंदी आहोत. तसंच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे महान नेते आहेत त्यांच्याबाबत मी काही बोलणार नाही असा टोलाही राजू पाटील यांनी लगावला.

हे पण वाचा- संजय राऊतांची फतव्यावर टीका, “राज ठाकरेंची औरंगजेबी वृत्तीच्या लोकांना साथ, हे पाहून बाळासाहेबांच्या आत्म्याला..”

मराठी माणसाची इच्छा पूर्ण होणार

“आज १८ वर्षांनी धनुष्यबाणाच्या चिन्ह समोर असताना राज ठाकरे भाषण करतील. एरवी ज्या सभा होतात त्या आमच्यासाठी महत्त्वाच्या असतातच पण आजची सभा ऐतिहासिक आहे. कारण धनुष्यबाण चिन्ह असताना राज ठाकरे भाषण करणार आहेत. माझं एकट्याचंच नाही तर मराठी माणसाची इच्छा यामुळे पूर्ण होणार आहे. धनुष्यबाणाच्या मंचावर राज ठाकरेंना पाहण्यासाठी मराठी माणूस आसुसला होता. आज मराठी माणसाची इच्छा पूर्ण होणार आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांना मानणारे शिवसैनिकही आज आमच्याबरोबर आहेत. राज ठाकरेंनी कुठलीही अट न घालता नरेंद्र मोदींना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे नरेंद्र मोदींनीही त्यांचं कौतुक केलं आहे. तसंच आम्हालाही राज ठाकरेंचा अभिमान आहे.” असं राजू पाटील म्हणाले आहेत.

राज ठाकरेंना आम्ही बाळासाहेबांचं प्रतिरुपच मानतो

“राज ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांचे प्रतिरूप आहेत असंच आम्ही मानतो. बाळासाहेब ठाकरे यांचा विचारांचा वारसा राज ठाकरे हेच चालवत आहेत. हे तुम्हाला सध्या दिसत आहे. इतर लोक कुणाच्या मागे फरफटत गेले ते सुद्धा महाराष्ट्राला दिसतं आहे. मराठी माणसांची एक इच्छा होती की, ठाकरे नाव हे हिंदुत्वासोबत असलं पाहिजे, आमच्यासह असलं पाहिजे, आज ती इच्छा पूर्ण होताना दिसत आहे. त्यामुळे मराठी माणूस, मनसैनिक आणि बाळासाहेबांचे शिवसैनिक आनंदात आहेत”, असा दावा राजू पाटील यांनी केला आहे. टीव्ही ९ ला दिलेल्या प्रतिक्रियेत राजू पाटील यांनी हे वक्तव्य केलं आहे.

मराठीतील सर्व निवडणूक २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mla raju patil big statement about mns chief raj thackeray ans shivsena stage scj