मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी ठाण्यातल्या कळवा या ठिकाणी भाषण केलं. या भाषणात त्यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली. धनुष्यबाण असलेल्या पोडियमवर राज ठाकरेंनी १८ वर्षांनी भाषण केलं. या भाषणात त्यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार तसंच महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली. राज ठाकरेंचं हे भाषण चर्चेत आलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय म्हणाले राज ठाकरे?

“वडील चोरले हा निवडणुकीचा विषय असू शकतो का? फोडाफोडीचे राजकारण मला मान्य नाही. पण जे लोक आज आमचा पक्ष फोडला म्हणून बोलत आहेत, त्यांनी त्यांच्या इंडिया आघाडीतील नेत्यांकडे एकदा पाहावे. त्यांनी याआधी काय उद्योग केलेत? हे आठवा. याच उद्धव ठाकरेंनी मनसेचे सात पैकी सहा नगरसेवक खोके देऊन तोडले होते. तेव्हा तुम्हाला काही नाही वाटलं?” असा प्रश्न राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना उद्देशून विचारला आहे.

आनंद दिघेंची आठवण आली

“सभेला यायच्या आधी आनंद मठात गेलो होतो, तेव्हा सगळे जुने दिवस आठवले.. आनंद दिघेंसह माझे मैत्रीपूर्ण संबंध होते. त्यांच्याबरोबर ठाण्यात फिरताना मजा यायची. मी बाळासाहेबांसह अनेकदा ठाण्याला आलो आहे. तेव्हाचं ठाणे खूप सुंदर आणि टुमदार शहर होतं. पण आज सगळं चित्र बदललं आहे. एके काळचं तलावांचं शहर आता टँकरचं शहर झालंय. काँक्रीटचं जंगल झालं आहे.” अशी खंत राज ठाकरेंनी व्यक्त केली.

हे पण वाचा- ‘या निवडणुकीत काही विषयच नाहीत, नुसत्या शिव्या’, राज ठाकरेंचा इशारा कुणाकडे?

शरद पवारांवर टीका आणि उद्धव ठाकरेंना सवाल

“ज्या शरद पवारांना आघाडीत घेऊन बसला आहात, त्यांनीच महाराष्ट्रात फोडाफोडीचं राजकारण सुरु केलं. सर्वात पहिला पक्ष त्यांनी फोडला, काँग्रेस, १९७८ ला, पुढे १९९१ ला छगन भुजबळांना शिवसेनेतून फोडलं आणि २००४ ला नारायण राणेंना काँग्रेसने फोडलं, तेव्हा हे आत्ता रडणारे कुठे होते? तेव्हा का नाही काही बोलले? बाळासाहेबांचा उल्लेख म्हातारा करणाऱ्या आणि त्यांचे हात लटपटत आहे असं म्हणणाऱ्या बाईला तुम्ही पक्षात घेता तेव्हा लाज नाही वाटली? ज्या छगन भुजबळांनी बाळासाहेबांना अटक केली, त्या छगन भुजबळांसह मंत्रिमंडळात बसताना लाज नाही वाटली? का नाही तेव्हा विरोध केला?” असे प्रश्न राज ठाकरेंनी विचारले आहेत.

महाराष्ट्रातील राजकारणाचा विचका उद्धव ठाकरेंनीच केला

“२०१९ ला उद्धव ठाकरेंनी भाजपासह विधानसभेची निवडणूक लढवली, पण निकालानंतर उद्धव ठाकरेंच्या लक्षात आलं की आपल्याशिवाय भाजपाचं सरकार बसणार नाही, तेव्हा त्यांनी पिल्लू सोडलं की अडीच अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाचं ठरलं होतं, आणि काय तर म्हणे बंद खोलीत ठरलं होतं, मग ते आधीच का नाही सांगितलं? आणि विधानसभेच्या प्रचाराच्या वेळेस जेव्हा नरेंद्र मोदी आमचे पुढचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत म्हणून सांगत होते, तेव्हा का नाही विरोध केलात? बरं, समजा जर उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपद मिळालं असतं, तर त्यांनी विरोध केला असता का? आज महाराष्ट्राच्या राजकारणाचा जो पार विचका झाला आहे, कोण कुठे आहे हे कळत नाहीये याला जबाबदार उद्धव ठाकरेच आहेत.” असंही राज ठाकरे म्हणाले.

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mns chief raj thackeray big allegation on sharad pawar also slams uddhav thackeray scj
Show comments