महायुतीमध्ये काही लोकसभा मतदारसंघाचा तिढा गेल्या काही दिवसांपासून सुटत नव्हता. मात्र, आज याबाबत अखेर निर्णय झाला. कल्याणमधून श्रीकांत शिंदे, ठाणे लोकसभा मतदारसंघामधून नरेश म्हस्के आणि नाशिक लोकसभा मतदारसंघात हेमंत गोडसे यांना उमेदवारी जाहीर झाली. ठाण्याच्या जागेबाबत भाजपा इच्छुक असल्याची चर्चा होती. मात्र, अखेर शिवसेना शिंदे गटाला ही जागा मिळाली. ठाण्यातून नरेश म्हस्के यांना उमेदवारी मिळाल्यानंतर मनसे नेते अविनाश जाधव यांनी प्रतिक्रिया देत मनसेची ठाण्यात दोन लाख मतं आहेत, त्यामुळे नरेश म्हस्के हे मनसेच्या मतांच्या जीवावर निवडून येतील, असे मत अविनाश जाधव यांनी व्यक्त केले.
अविनाश जाधव काय म्हणाले?
“नरेश म्हस्के यांचा विजय खूप सोपा आहे. कारण भारतीय जनता पक्षाचे त्या मतदारसंघात नगरसेवकांची सख्या जास्त आहे. मुख्यमंत्र्यांचे वर्चस्व असलेला हा लोकसभा मतदारसंघ आहे. येथे राजन विचारे यांचा कार्यकाळ आपण पाहिला तर मागच्या दोन वर्षात आघाडीचे सरकार पडल्यापासून ते दिसायला लागले आहेत. अन्यथा आम्हाला आठ वर्ष खासदार शोधावे लागत होते. त्यामुळे ही लढाई कढीण असेल असे नाटत नाही. कारण मनसेची तेथे दोन लाख मते आहेत. मागच्या विधानसभा निवडणुकीत जवळपास दोन लाख मत पडली होती. त्यामुळे नरेश म्हस्के मनसेच्या मतांच्या जीवावर निवडून येतील”, असे अविनाश जाधव म्हणाले.
हेही वाचा : महायुतीचा नाशिकच्या जागेवरील तिढा सुटला, शिवसेनेच्या शिंदे गटाकडून ‘या’ नेत्याला उमेदवारी
पुढे ते म्हणाले, “प्रचार किती केला हे महत्वाचे नाही. अनेक लोक दोन-दोन वर्ष प्रचार करुनही निवडणुकीत पडतात. माझे मत आहे की, तेथील तुल्यबळ काय आहे. ठाण्यात भारतीय जनता पार्टी, शिवसेनेची ताकद आहे. त्यातच आता मनसेची जवळपास दोन लाख मते त्यांच्या पारड्यात पडतील. त्यामुळे मला हा एक तर्फी विजय वाटत आहे, असेही अविनाश जाधव म्हणाले.
श्रीकांत शिंदे,नरेश म्हस्के राज ठाकरेंच्या भेटीला
खासदार श्रीकांत शिंदे आणि नरेश म्हस्के यांना लोकसभेची उमेदवारी आज जाहीर झाली. त्यानंतर श्रीकांत शिंदे आणि नरेश म्हस्के यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची शिवतीर्थ या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. या भेटीत लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा झाल्याची माहिती सांगितली जात आहे.