PM Modi Oath Ceremony: लोकसभा निवडणुकीत एनडीएला बहुमत मिळाल्यानंतर आज नरेंद्र मोदींनी तिसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली आहे. या मंत्रिमंडळात विविध खासदारांना कॅबिनेट आणि राज्यमंत्री म्हणून शपथ देण्यात आली. देशभरात हा सोहळा चर्चेचा विषय ठरला आहे. तसंच जगातल्या काही महत्त्वाच्या नेत्यांनीही नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत. आता चर्चा होते आहे ती गुजरातमधल्या मराठी खासदाराची. गुजरातमधल्या एका मराठी खासदाराला केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं आहे.

आधी मोदी, नंतर पहिले पाच मंत्री!

आज शपथविधी समारंभात शपथ घेण्याचा निश्चित क्रम ठरलेला होता. त्यानुसार, सर्वात आधी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शपथ घेतली. त्यांच्यानंतर राजनाथ सिंह यांनी शपथ घेतली. तिसऱ्या क्रमांकावर अमित शाह यांनी शपथ घेतली. चौथ्या क्रमांकावर नितीन गडकरी तर पाचव्या क्रमांकावर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी शपथ घेतली. नड्डांच्या नंतर शिवराज सिंह चौहान यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. या क्रमानंतर कॅबिनेट मंत्री होणाऱ्या आणि राज्यमंत्री होणाऱ्या खासदारांना शपथ देण्यात आली. या मंत्रिमंडळात गुजरातच्या मराठी खासदाराचा समावेश झाला आहे. त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा होते आहे. आपण जाणून घेऊ कोण आहेत हे खासदार

सी. आर पाटील हे गुजरातमधले मराठी खासदार

सी. आर. पाटील हे गुजरातमधले मराठी खासदार आहेत. त्यांचा जन्म १६ मार्च १९५५ या दिवशी महाराष्ट्रातल्या जळगावात असलेल्या पिंपरी आकराऊत गावात झाला आहे. त्यांचे वडील रघुनाथ पाटील पोलीस हवालदार होते. चंद्रकांत रघुनाथ पाटील असं त्यांचं नाव आहे. गुजरातच्या नवसारी या मतदारसंघातून चंद्रकांत रघुनाथ पाटील तीनवेळा निवडून आले आहेत. त्यानंतर ते पहिल्यांदाच मंत्री होत आहेत. त्यामुळे त्यांच्या नावाची चर्चा आहे. चंद्रकांत रघुनाथ पाटील हे गुजरात भाजपाचे अध्यक्षही आहेत. तसंच मोदींच्या विश्वासू नेत्यांपैकी एक अशी त्यांची ओळख आहे.

पोलीस सेवेत काम, १९९१ मध्ये सुरु केलं वृत्तपत्र

चंद्रकांत रघुनाथ पाटील हे त्यांच्या वडिलांप्रमाणेच पोलीस सेवेत होते, त्यांनी हवालदार म्हणून कर्तव्य बजावलं आहे. काही वर्षांनी त्यांनी पोलीस सेवेतून स्वेच्छा निवृत्ती घेतली आणि राजकारणात प्रवेश केला. त्याआधी त्यांनी पत्रकारितेचंही शिक्षण घेतलं. १९९१ मध्ये त्यांनी नवगुजरात टाइम्स हे गुजराती दैनिक सुरु केलं. तसंच भाजपातल्या विविध जबाबदाऱ्याही त्यांनी सांभाळल्या.

हे पण वाचा- PM Narendra Modi Oath Taking Ceremony Live Updates : मुरलीधर मोहोळ आणि रक्षा खडसेंनी घेतली राज्यमंत्रीपदाची शपथ

मराठी, गुजराती, हिंदी, इंग्रजी भाषांवर प्रभुत्व

चंद्रकांत रघुनाथ पाटील यांचं गुजरातीसह, मराठी, हिंदी, इंग्रजी अशा चार भाषांवर प्रभुत्व आहे. सुरत या ठिकाणी आयटीआयचं शिक्षण घेतल्यानंतर ते १९७५ मध्ये पोलीस दलात रुजू झाले. १९८९ मध्ये त्यांनी भाजपात राजकीय कारकीर्द सुरु केली. सुरुवातीला ते सुरत भाजप समितीचे कोषाध्यक्ष झाले, त्यानंतर सुरत भाजपाचे शहर उपाध्यक्ष झाले. गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री केशुभाई पटेल यांनी १९९८ मध्ये चंद्रकांत पाटील यांची राज्य पीएसयू गुजरात अल्कलीज अँड केमिकल्सचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली. १९९५ मध्ये ते प्रदेश सरचिटणीस झाले तेव्हा त्यांची ओळख नरेंद्र मोदींशी झाली. त्यानंतर हळूहळू ते नरेंद्र मोदींच्या निकटवर्तीयांपैकी एक म्हणून ओळखले जाऊ लागले.

मोदींनी पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यावर एकनाथ शिंदेंची खास पोस्ट, “…उराशी बाळगलेलं स्वप्न”

समाजकार्याची सी. आर. पाटील यांना आवड

सुरुवातीपासूनच समाजकार्याची चंद्रकांत रघुनाथ पाटील यांना आवड होती. धूरमुक्त गाव, आदर्श गाव ही योजना त्यांनी सुरु केली आणि यशस्वीपणे राबवली. सूरत विमानतळाचा विकास करण्यातही त्यांचा मोलाचा वाटा आहे. तसंच कोव्हिड काळातही त्यांनी अनेक गरजू आणि गरीब व्यक्तींना हर तऱ्हेने मदत केली आहे. त्यांच्या समाजकार्यासाठी ते ओळखले जातात. आता गुजरात मधल्या या मराठी खासदाराला केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळालं आहे. त्यांच्याकडे कुठलं खातं दिलं जाणार हे पाहणंही महत्त्वाचं असणार आहे.