शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदार डॉ.अमोल कोल्हे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार, माजी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांच्यामध्ये लढत होत आहे. शिरूर लोकसभेची निवडणूक ही चुरशीची लढाई मानली जाते. चौथ्या टप्प्यातील निवडणुकीच्या प्रचाराची सांगता शनिवारी झाली. यावेळी एका सभेत बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अमोल कोल्हे यांच्यावर टीका करत आव्हान दिले होते. त्यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना अमोल कोल्हे यांनी करारा जबाब मिलेगा, आता कफन बांधलेला बंडखोर अमोल कोल्हे बघाल, असा इशारा त्यांनी अजित पवार यांना दिला.
अमोल कोल्हे काय म्हणाले?
“शिवसिंहाची औलाद आहे थांबणार नाही. लोकसभा निवडणुकीचा प्रचार संपल्यानंतर अजून विधानसभेच्या निवडणुका बाकी आहेत. करारा जबाब मिलेगा. एवढंच नाही तर शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व निवडणुकीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही आतापर्यंत आज्ञाधारक अमोल कोल्हे बघितला, आता कफन बांधलेला बंडखोर अमोल कोल्हे बघाल”, अशा शब्दात खासदार अमोल कोल्हे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना थेट आव्हान दिलं.
हेही वाचा : संजय राऊतांचा देवेंद्र फडणवीसांना खोचक टोला; म्हणाले, “राजकारणातलं कच्चं मडकं…”
अजित पवार काय म्हणाले होते?
“पाच वर्षांपूर्वी मी चूक केली. अमोल कोल्हे यांचा पक्षप्रवेश करून घेतला, त्यांना शिरूर लोकसभा मतदरासंघामधून उमेदवारी दिली. त्यानंतर ते खासदार म्हणून निवडून आल्यानंतर असं वाटलं होतं की, शिरूर लोकसभा मतदरासंघाचा विकास करतील. मात्र, यावेळी ती चूक सुधारा”, असे अजित पवार एका सभेत बोलताना म्हणाले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी शिरूर लोकसभा मतदारसंघातील एका सभेत बोलताना शरद पवार गटाचे शिरूरचे आमदार अशोक पवार यांना खुले आव्हान दिले होते. “आरे पठ्ठ्या तू आमदार कसा होतो तेच बघतो, मंत्री होतो काय?”, अशा शब्दात अजित पवारांनी आव्हान दिले होते. यानंतर त्यांनी अहमदनगरच्या सभेत निलेश लंके यांनाही आव्हान दिले होते. त्याचबरोबर बीडच्या सभेत बोलताना बजरंग सोनवणे यांनाही आव्हान दिले होते. त्यामुळे निवडणुकीच्या प्रचारात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटातच आरोप-प्रत्यारोप रंगल्याचे पाहायला मिळाले. अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी अमोल कोल्हे यांना आव्हान दिले होते. अमोल कोल्हे कसे निवडून येतात तेच पाहतो, असे अजित पवार म्हणाले होते. त्यानंतर आता अजित पवार यांनी आमोल कोल्हे यांच्यावर बोलताना पाच वर्षापूर्वी चूक झाल्याचं म्हटलं आहे.