गुजरातप्रमाणेच मध्य प्रदेशातही काँग्रेसला धक्का बसला आहे. इंदूर लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार अक्षय कांति बम यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. तसंच काँग्रेसचा हात सोडून त्यांनी भाजपाचं कमळ हाती घेतलं आहे. भाजपाचे वरिष्ठ नेते आणि मध्य प्रदेश सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री असलेले कैलाश विजयवर्गीय यांनी ही माहिती दिली आहे.
कैलाश विजयवर्गीय यांनी दिली माहिती
कैलाश विजयवर्गीय यांनी अक्षय बम यांच्यासह सेल्फी काढत तो शेअरर केला आहे. सोशल मीडियावर या बातमीची चर्चा रंगली आहे. इंदूर काँग्रेसचे उमेदवार अक्षय कांति बम यांचं भाजपात स्वागत आहे. पंतप्रधान मोदी, राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नडड्डा यांच्या नेतृत्वातल्या भाजपाचं कमळ त्यांनी हाती घेतलं त्यामुळे आम्ही त्यांचं स्वागत करतो या आशयाच्या ओळीही विजयवर्गीय यांनी लिहिल्या आहेत.
नेमकं काय घडलं?
इंदूर लोकसभा मतदारसंघासाठी अर्ज भरण्याची तारीख २५ एप्रिल होती आणि मागे घेण्याची तारीख आजची म्हणजेच २९ एप्रिलची होती. त्याआधीच कैलाश विजय वर्गीय यांनी खास मोहीम राबवली आणि काँग्रेसच्या उमेदवारालाच पक्षात घेतलं. इंदूरमध्ये १३ मे रोजी मतदान पार पडणार आहे. तर ४ जूनला निकाल लागणार आहे.
मध्य प्रदेशातील इंदूर या लोकसभा मतदारसंघातून अक्षय कांति बम यांनी काँग्रेसकडून त्यांचा अर्ज २४ एप्रिलला दाखल केला होता. त्यांनी त्यांच्याकडे ५७ कोटींची संपत्ती असल्याचंही प्रतिज्ञापत्रात जाहीर केलं. अक्षय बम यांच्याकडे कोणतीही कार नाही. मात्र त्यांच्या घड्याळाची किंमत १४ लाख रुपये आहे.
सूरतमध्ये काय घडलं होतं?
काही दिवसांपूर्वी सूरत लोकसभा मतदारसंघाचे भाजपाचे उमेदवार मुकेश दलाल यांना निकालापूर्वीच बिनविरोध विजेते उमेदवार असं जाहीर करण्यात आलं होतं. कारण त्यांचे प्रतिस्पर्धी निलेश कुंभानी यांची उमेदवारी रद्द करण्यात आली. काँग्रेसने तोडकं मोडकं स्पष्टीकरण दिलं पण काही उपयोग झाला नाही. त्यामुळे मुकेश दलाल लोकसभेचा निकाल लागण्याआधीच बिनविरोध निवडले गेल्याचं जाहीर करण्यात आलं होतं. आता तशीच घटना मध्यप्रदेशातही घडल्याचं दिसून येतं आहे.