पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पेहराव नेहमीच चर्चेचा विषय असतो. ज्या प्रांतात ते जातात तेथील ते पेहराव परिधान करतात. तर, नियमित शासकीय कामांसाठीही त्यांचे ठराविक सूट असतात. दिवसभरातील विविध कार्यक्रमात ते कधीकधी वेगवेगळे कपडेही घालतात. यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी टीका केली आहे. ते मध्य प्रदेशातील सतना जिल्ह्यातील प्रचारादरम्यान बोलत होते.
मध्य प्रदेसात १७ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. यामुळे निवडणूक प्रचाराला वेग आला आहे. मोदींच्या आणि राज्य सरकारच्या धोरणांवर टीका केली जातेय. त्यातच, राहुल गांधी यांनी मोदींच्या कपड्यांचाच मुद्दा उचलून धरला. पंतप्रधान नरेंद्र मोदी दररोज लाखो रुपयांचे सूट घालतात तर मी फक्त एक साधा पांढरा टी-शर्ट परिधान करतो, अशी टीका काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांनी केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी दर दिवशी निदान दोन सूट बदलतात. एकच सूट ते पुन्हा परिधान करताना तुम्ही पाहिलंय का? असा प्रश्न विचारताच जनतेमधून नाही असा प्रतिसाद आला. “मी हा एकच पांढरा शर्ट घालतो”, असं राहुल गांधी म्हणाले.
सत्तेत आल्यास जनगणना करणार
“राज्यात सत्तेवर आल्यानंतर मध्य प्रदेशातील ओबीसींची नेमकी संख्या जाणून घेण्यासाठी सर्वप्रथम जात जनगणना केली जाईल. ओबीसी जनगणना हे क्ष-किरणसारखे आहे. ज्यामुळे इतर मागासवर्गीयांची संख्या निश्चित होईल, त्यानुसार त्यांच्या कल्याणासाठी धोरणे आखली जातील”, असंही राहुल गांधी म्हणाले.
केंद्रात काँग्रेसची सत्ता आल्यास देशव्यापी जात जनगणना केली जाईल, हा उपक्रम नागरिकांसाठी क्रांतीकारक आणि जीवन बदलणारं पाऊल ठरणार आहे, असं ते म्हणाले. तसंच, तरुण योगदान देण्यास इच्छुक आहेत, परंतु त्यांच्याकडे नोकऱ्या नाहीत, अशीही टीका त्यांनी केली.