PM Narendra Modi Oath Ceremony Updates, 9 June 2024: केंद्रात आज एनडीए ३.० अर्थात एनडीएच्या सलग तिसऱ्या सरकारचा शपथविधी पार पडणार आहे. नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेत असून त्यांच्यासह जवळपास ५० खासदार मंत्रीपदाची शपथ घेणार असल्याचं सांगितलं जात आहे. यामध्ये एनडीएमधील अनेक मित्रपक्षांच्या खासदारांचा समावेश आहे. महाराष्ट्रात मात्र मंत्रीपदांची मोठी चर्चा घडताना दिसत आहे. एकीकडे अजित पवार गटाला एकही मंत्रीपद मिळालं नसताना दुसरीकडे एकनाथ शिंदे गटाला मिळालेलं मंत्रीपद श्रीकांत शिंदेंऐवजी प्रतापराव जाधवांना दिल्याची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. यावर बोलताना श्रीकांत शिंदेंनी मंत्रीपद नाकारण्यामागचं कारण सांगितलं आहे.

नेमकं काय घडतंय महाराष्ट्रात?

लोकसभा निवडणुकांमध्ये एनडीएला बहुमत मिळालं. त्यानंतर आता केंद्रात मंत्रीपदी कुणाकुणाची वर्णी लागणार? याची जोरदार चर्चा पाहायला मिळाली होती. शपथविधीसंदर्भात देशभरातील अनेक खासदारांना फोन गेले असताना अजित पवार गटातील एकाही खासदाराला मंत्रीपद देण्यात आलेलं नाही. “आम्ही राज्यमंत्रीपद स्वतंत्र पदभार हे पद देऊ करत होतो. मात्र, त्यांना कॅबिनेट मंत्रीपद हवं होतं. त्यामुळे पुढच्या मंत्रीमंडळ विस्तारावेळी त्यावर विचार करण्यात येईल”, अशी माहिती देवेंद्र फडणवीसांनी दिली.

एनडीएच्या पहिल्या बैठकीत गडकरी मोदींबाबत म्हणाले “ ते विश्वगुरू..”

दुसरीकडे शिंदे गटाला एक केंद्रीय मंत्रीपद मिळालं असून ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांना मिळणार असल्याचं सांगितलं जात होतं. मात्र, अखेर मंत्रीपदाची माळ प्रतापराव जाधव यांच्या गळ्यात पडली. श्रीकांत शिंदेंनी मंत्रीपद नाकारल्याची चर्चा सुरू झाल्यानंतर त्यांनी यावर टीव्ही ९ शी बोलताना स्पष्टीकरण दिलं आहे.

काय म्हणाले श्रीकांत शिंदे मंत्रीपदाबाबत?

“एकनाथ शिंदेंनी नेहमीच कार्यकर्त्याला प्राधान्य दिलं. आजही तेच उदाहरण महाराष्ट्रानं पाहिलं. मी तिसऱ्यांदा खासदार झालो. सध्याच्या परिस्तितीतही मोठ्या मताधिक्यानं निवडून आलो. सगळ्यांची इच्छा होती की मी केंद्रात मंत्री व्हायला हवं. पण आत्ता पक्षाला सगळ्यात जास्त गरज पक्षबांधणीची आहे”, असं श्रीकांत शिंदे म्हणाले.

नरेंद्र मोदींच्या शपथविधीसाठी नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल दिल्लीत दाखल

“फक्त दोन वर्षांत लोकांना वाटत नव्हतं की शिवसेनेचे २ खासदारही निवडून येतील. पण आज सर्वात चांगला स्ट्राईक रेट शिवसेनेचा आहे. ७ खासदार निवडून आले. ४ खासदार आणखी निवडून आले असते. शेवटच्या क्षणी त्यांचं नाव जाहीर करणं, बदल करणं या गोष्टी केल्या नसत्या तर आम्ही २ अंकी संख्या गाठली असती. पण या चुका झाल्या. त्याचं विवेचन होऊन आम्ही त्यावर मार्ग काढू”, असंही श्रीकांत शिंदेंनी नमूद केलं.

“योग्य तो संदेश गेला आहे”

दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी आपल्याला मंत्रीपद न दिल्यामुळे महाराष्ट्रात योग्य संदेश गेला आहे, असं श्रीकांत शिंदे म्हणाले. “आमचा पक्ष कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. माझ्यापेक्षा जेष्ठ सदस्य पक्षात आहेत. त्यांना मुख्यमंत्र्यांनी संधी दिली. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये, महाराष्ट्रात योग्य तो संदेश गेला आहे”, असं ते म्हणाले.

अजित पवार गटाला एकही मंत्रीपद नाही; देवेंद्र फडणवीसांची सुनील तटकरेंच्या घरी नेत्यांशी झाली सविस्तर चर्चा!

उद्धव ठाकरेंना टोला

यावेळी बोलताना श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना नाव न घेता टोला लगावला आहे. “याआधी अनेक उदाहरणं आपण पाहिली. काही पक्षांमध्ये त्यांनी स्वत:चा मुलगा पॅराशूट लँडिंग करून आमदार करून घेतला. दोन विद्यमान आमदारांना घरी बसवलं. पुन्हा त्यांना आमदार केलं. त्यानंतर मुलाला मंत्रीपद दिलं. जिथे कार्यकर्त्यांना प्राधान्य द्यायचं होतं, तिथे तीन तीन जणांना एकाच विधानसभेत तुम्हाला आमदारकी द्यावी लागली. मी तर तिसऱ्यांदा खासदार झालो आहे. मंत्रीही झालो असतो. पण मंत्रीपदापेक्षा पक्षाला माझी जास्त गरज आहे असं मला वाटतं. शिंदेंनी पुत्रमोह बाजूला ठेवला. त्यांच्या पुत्रानंही पक्षासाठी तो निर्णय मान्य केला”, अशा शब्दांत श्रीकांत शिंदेंनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला.