लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
ठाणे : काँग्रेसचे नेते रमेश चेन्नीथला हे राज्यात सरकार आल्यावर जातीगणना करू असे आश्वासन देत आहेत. परंतु त्यांचे नेते राहुल गांधी यांनी दोनदा सांगितले आहे की आरक्षणची गरज नाही आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी त्याचे समर्थन केले आहे. त्यामुळे नेत्यांमध्ये एक वाक्यता नसून त्यांच्याकडे विचार आणि विषय नसल्यामुळे अशी विधाने करून निवडणुकीच्या तोंडावर वातावरण बिघडविण्याचे काम करीत आहेत, असा आरोप केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी बुधवारी ठाण्यात पत्रकार परिषदेत बोलताना केला.
अडीच वर्षांपुर्वी जनतेचा जनाधाराचा अपमान करून राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले. या सरकारने आमच्या सरकारच्या काळात सुरू झालेल्या योजना बंद करण्याचे काम केले. त्यामुळे घरी बसून केवळ योजना बंद करण्यासाठीच हे सरकार निर्माण झाल्याची प्रतिमा तयार झाली, अशी टिका केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले. जम्मू-कश्मीरमधील सरकार ३७० कलम हटविण्याबाबत बोलत आहे. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी मात्र हे कलम हटविणार नाही, असे स्पष्ट केले आहे. तसेच जे लोक संविधानावर बोलतात. त्यांना संविधानाचा खरा अर्थ माहित नाही. एक देश, एक निशाण, एक संविधान असा संविधानचा अर्थ आहे. यामुळे त्यांच्यासाठी हे संविधान महत्वाचे नाही, अशी टिकाही त्यांनी केली.
आणखी वाचा-“विरोधकांनी योजनांसह वचननामाही चोरला…”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची अंबरनाथमध्ये टीका
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या दहा वर्षात आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाची प्रतिमा उंचावण्याचे काम केले तर दुसरीकडे सर्वसामान्यांचे जीवन समृद्ध करण्याचे काम झाले. मोदी यांनी सुरू केलेल्या योजनेंचा लाभ नागरिकांना झाला असून जवळपास दहा लाख कोटी रुपये सर्वसामान्य नागरिकांच्या बँक खात्यात जमा झाले. तर, दुसरीकडे सर्वसामान्य माणसाच्या कल्याणासाठी योजनेतून एक रुपया दिला तर, त्यापैकी नागरिकांपर्यंत १५ पैसे पोहचायचे, असे राजीव गांधी हे स्वत: म्हणायचे, असेही ते म्हणाले. राज्यातील महिलांसाठी आम्ही लाडकी बहिण योजना सुरू केली. परंतु हे पैसे कसे देणार अशी फसवी योजना अशी टिका काँग्रेसचे नेते करत होते. परंतु त्यांनीच आता त्यांच्या वचननाम्यात महिलांना तीन हजार रुपये देऊ असे सांगितले. त्यामुळे हे खोटे कसे बोलतात, हे दिसून येते. खोटे हे फार काळ टिकत नसते, असेही ते म्हणाले.