Delhi Assembly Election 2025 : दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालात भारतीय जनता पक्षाने गेल्या तीन टर्मपासून सत्तेत असलेल्या आम आदमी पक्षाला पराभूत करत, तब्बल २६ वर्षांनी पुनरागम केले आहे. एकीकडे आम आदमी पक्षाच्या अनेक बड्या नेत्यांचा पराभव झाला असतानाही, मुस्लिम बहुल मतदारसंघात आम आदमी पक्षाच्या उमेदवारांनी चांगली कामगिरी केली असल्याचे पाहायला मिळत आहे. मुस्लिम समुदायाच्या मतदारांची संख्या लक्षणीय असलेल्या सातपैकी सहा जागांवर आम आदमी पक्षाचे उमेदवार विजयाच्या दिशेने वाटचाल करत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुस्तफाबाद वगळता, चांदणी चौक, मतिया महल, बाबरपूर, सीलमपूर, ओखला आणि बल्लीमारन येथे आपचे उमेदवार आघाडीवर आहेत. पाच वर्षांपूर्वी, आम आदमी पक्षाने या सर्व सातही जागा मोठ्या फरकाने जिंकल्या होत्या.

२०२० च्या दंगली आणि सीएएविरोधी निदर्शनांच्या वेळी आम आदमी पक्ष त्यांच्या बाजूने उभा राहिला नाही, अशी भावना मुस्लिम समुदायात असूनही, मुस्लिम सामुदायाने आपला भाजपाला आव्हान देऊ शकणारा एकमेव व्यवहार्य पर्याय म्हणून आपला पसंती दिली आहे.

अल्पसंख्याक समुदायातील आम आदमी पक्षाच्या एका नेत्याने म्हटले की, “एकूण निकालाच्या तुलनेत अल्पसंख्याक समुदायाकडून मिळालेला पाठिंबा हा आश्वासकन आहे. आमचा पक्ष मुस्लिम समुदायात फारसा लोकप्रिय नसला तरी, या निवडणुकीत मुस्लिम समाज आमच्या पाठीशी नक्कीच उभा राहिला आहे.” याबाबत इंडियन एक्सप्रेसने वृत्त दिले आहे.

दरम्यान २०२० च्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत फक्त १६ मुस्लिम उमेदवार उभे राहिले होते, परंतु यावेळी बसपा आणि एआयएमआयएम सारख्या लहान पक्षांनी मुस्लिम समुदायाचे उमेदवार उभे केल्याने ही संख्या दुप्पट झाली होती.

२०२० प्रमाणे यंदाही आम आदमी पक्षाने मध्य दिल्लीतील मटिया महल आणि बल्लीमारन, आग्नेय दिल्लीतील ओखला आणि ईशान्य दिल्लीतील सीलमपूर आणि मुस्तफाबाद या पाच जागांवर मुस्लिम उमेदवार उभे केले होते. दलित आणि झोपडपट्टीतील रहिवाशांसह, दिल्लीच्या १.५५ कोटी मतदारांपैकी सुमारे १३% असलेल्या मुस्लिम समुदायाने २०१५ आणि २०२० च्या विधानसभा निवडणुकीत ‘आप’ला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. तेव्हा आम आदमी पक्षाने ७० पैकी अनुक्रमे ६७ आणि ६२ जागा जिंकल्या होत्या.

एमआयएम

असदुद्दीन ओवैसी यांच्या नेतृत्वाखालील एमआयएमने मोठ्या प्रमाणात मुस्लिम लोकसंख्या असलेल्या ओखला आणि मुस्तफाबाद या दोन जागांवर उमेदवार उभे केले होते. दिल्ली दंगलीतील आरोपी आणि आपचे माजी नगरसेवक ताहिर हुसेन मुस्तफाबादमध्ये तिसऱ्या स्थानावर राहीले आहेत. तर पक्षाचे दुसरे उमेदवार शिफा उर रहमान खान, जे २०२० च्या दंगलीतील आरोपी आहेत, ते ओखलामध्ये दुसऱ्या स्थानावर आहेत.

काँग्रेस

काँग्रेसने प्रचारादरम्यान मुस्लिम समुदायावर लक्ष केंद्रित केले असले तरी, त्यांना त्याचे मतांमध्ये रूपांतर करण्यात अपयश आले. सात जागांपैकी सहा जागांवर काँग्रेस पक्ष तिसऱ्या स्थानावर राहिला आहे. तर ओखलामध्ये ते चौथ्या स्थानावर आहेत. काँग्रेस नेत्यांनी कबूल केले आहे की, राष्ट्रीय राजधानीत भाजपाला आव्हान देऊ शकणारी शक्ती आम्ही आहोत हे या समुदायाला पटवून देण्यात पक्ष अपयशी ठरला असावा.

२०२० च्या निवडणुकीत, काँग्रेसने फक्त पाच मुस्लिम उमेदवार उभे केले होते. त्या पाचही जागांवर ‘आप’चे मुस्लिम उमेदवार विजयी झाले होते. यावेळी, काँग्रेसने सात उमेदवार उभे केले होते.