उत्तर प्रदेशातल्या मुस्लीम महिला गपचूप घराबाहेर पडून भाजपाला मत देतील, असं विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी केलं. तिहेरी तलाकविरोधात केलेल्या कायद्यामुळे उत्तर प्रदेशातल्या हजारो मुस्लीम महिलांचा बचाव झाल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. कर्नाटकात चाललेल्या हिजाबच्या वादादरम्यान पंतप्रधान मोदींनी हे विधान केलं आहे.
कानपूर, कानपूर ग्रामीण आणि जलौन जिल्ह्यातल्या १० विधानसभा मतदारसंघांसाठीच्या प्रचारसभेत बोलताना मोदी म्हणाले, “आमच्या मुस्लीम माताभगिनींनी मोदीला मत द्यायचा निर्णय घेतला आहे. त्यांना माहित आहे की जे सुख-दुःखात सहभागी होतात तेच आपले असतात. मुस्लीम मुलींना उत्तर प्रदेशातल्या भाजपा सरकारमध्ये सुरक्षित वाटत आहे. राज्यातल्या बहुसंख्य मुस्लीम मुली आता शाळा- कॉलेजला जाऊ लागल्या आहेत. आमच्या मुस्लीम लेकींना रस्त्यावर होणाऱ्या छेडछाडीमुळे शिक्षण घेताना अनेक अडथळे आले आहेत. मात्र आता सरकारने गुन्हेगारीला आळा घातल्याने त्यांना सुरक्षित वाटत आहे”.
समाजवादी पक्षावर निशाणा साधत ते म्हणाले की त्यांच्या राज्यात उत्तर प्रदेशातले वेगवेगळे परिसर या परिवाराला लूट करता यावी अशा पद्धतीने विभागले होते. मोदी पुढे म्हणाले, “त्यांच्याकडे मार्ग असता तर त्यांनी कानपूर आणि उत्तर प्रदेशातील इतर भागांना ‘माफियागंज’ भाग बनवले असते. आता त्यांची ‘माफियागिरी’ अखेरचा श्वास मोजत आहे. या ‘परिवारवादी’लोकांना माफियांना पुन्हा सत्ता द्यायची आहे. उत्तर प्रदेशच्या जनतेला सतर्क राहावे लागेल”.
तृणमूल काँग्रेस हिंदू मतांचे विभाजन करण्यासाठी गोव्यात निवडणूक लढवत असल्याचे सांगून पंतप्रधान मोदींनी त्यांची खिल्ली उडवली.