MVA : “२७० जागांवर आमचं एकमत, महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार..”, नाना पटोलेंनी काय सांगितलं?

आमची शरद पवारांशी जागावाटपावर चर्चा झाली आणि आम्ही फॉर्म्युलाही ठरवला आहे असंही नाना पटोले आणि संजय राऊत यांनी सांगितलं.

MVA PC About Seat Sharing
महाविकास आघाडीची पत्रकार परिषद (फोटो -ANI)

महाविकास आघाडीच्या जागावाटपाचं घोडं गंगेत न्हायलं आहे. शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाने यादी जाहीर केल्यानंतर महाविकास आघाडीची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत २७० जागांवर आमचं एकमत झालं आहे असं संजय राऊत, नाना पटोले यांनी सांगितलं. तसंच महाराष्ट्रात महाविकास आघाडीच सत्तेत येईल असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला.

संजय राऊत काय म्हणाले?

२८८ जागांचा प्रश्न सुटला असं सांगतो तेव्हा ते अत्यंत जबाबदारीनं सांगतो. आमच्या मित्रपक्षांसोबत चर्चा सुरु आहेत. आमच्या यादीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या जागा असल्या तरी चर्चा सुरु आहेत. महाविकास आघाडीत आम्ही एकत्र आहोत आणि चर्चा सुरु आहेत, असं संजय राऊत म्हणाले.

नाना पटोले काय म्हटलं आहे?

नाना पटोले यांनी तीन राजकीय पक्षांची बैठक शरद पवार यांच्यासमोर झाली. ८५-८५-८५ या जागांवर मिळून एकूण २७० जागांवर एकमत झालं आहे. उर्वरित १८ जागांवर शेकाप, कम्युनिस्ट, समाजवादी पक्षांसोबत चर्चा सुरु आहेत. उद्या या जागांवर आमच्यामध्ये स्पष्टता येईल. महाविकास आघाडी म्हणून ही निवडणूक लढत आहोत. महाराष्ट्रात मविआचं सरकार येईल, असं नाना पटोले म्हणाले. शरद पवार यांच्यासह झालेल्या बैठकीनंतर मविआच्या सर्व पक्षाच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेत जागावाटपासंदर्भातील घोषणा केली आहे. मविआ १८ जागा कुणाला देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. ठाकरेंच्या शिवसेनेकडून पहिल्या यादीत ६५ उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. मात्र तिन्ही पक्षांकडून काही नावांची घोषणा करण्यात आली असली तरी त्यामध्ये बदल होतील, असं संजय राऊत म्हणाले.

शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या ६५ जागा जाहीर

दरम्यान, मविआच्या तीन पक्षांकडून पहिल्या टप्प्यात ८५-८५-८५ जागा घेण्यात आल्या असल्या तरी ज्या जागांवरुन वाद होत्या त्या मागं ठेवण्यात आल्या आहेत. मविआकडून मित्रपक्षांना १८ जागा सोडल्या जातील असं सांगण्यात आलं. मुंबईत ठाकरेंच्या शिवसेनेकडून वांद्रे पूर्वमधून वरुण सरदेसाईंना उमेदवारी जाहीर करण्यात आली. तर, ज्या जागांवरुन वाद होता त्या भायखळा आणि वर्सोवा या जागांवरील उमेदवारांच्या नावांची घोषणा सेनेकडून करण्यात आलेली नाही.

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Mva pc about seat sharing in maharashtra assembly election what nana patole said scj

First published on: 23-10-2024 at 19:19 IST
Show comments