MVA Seat Sharing for Maharashtra Assembly Election 2024: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या घडामोडींना आता वेग आला आहे. महायुती, महाविकास आघाडी, मनसे, वंचित बहुजन विकास आघाडी आणि तिसरी आघाडी यांच्याकडून जागावाटप व काही ठिकाणी उमेदवारांच्या नावांचीही घोषणा केली गेली आहे. या पार्श्वभूमीवर आता प्रचाराचा जोर वाढू लागला आहे. मात्र, महाविकास आघाडीनं बुधवारी संध्याकाळी जाहीर केलेल्या जागावाटपाच्या फॉर्म्युल्याची सध्या चर्चा चालू आहे. कारण मविआकडून जाहीर करण्यात आलेल्या जागावाटपामध्ये २७३ जागांचाच हिशेब लागत असून उरलेल्या १५ जागांचं काय? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. त्यावर काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी उत्तर दिलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मविआचं जागावाटप जाहीर, पण गणित जुळेना!

बऱ्याच चर्चा आणि मतभेदांनंतर अखेर बुधवारी संध्याकाळी महाविकास आघाडीचं जागावाटप जाहीर करण्यात आलं. मात्र, त्यातही फक्त २५५ अधिक १८ अशा २७३ जागांचंच गणित जाहीर करण्यात आलं. पण उरलेल्या १५ जागांचं काय? याबाबत आता तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे. संजय राऊतांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार तिन्ही पक्ष प्रत्येकी ८५ जागा लढवतील. एकूण २७० जागांवर सहमती झाली असून उरलेल्या १८ जागा आमच्या मित्रपक्षांसाठी दिल्या जातील, असं संजय राऊत म्हणाले.

पक्षकाँग्रेसशिवसेना
(उद्धव ठाकरे)
राष्ट्रवादी
(शरद पवार)
मित्रपक्ष?
जागा (२८८)८५८५८५१८१५

मात्र, प्रत्येकी ८५ जागांनुसार फक्त २५५ जागांचाच हिशेब लागत असून सहमती २७० जागांवर झाली असेल तर वरच्या १५ जागांचं काय? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी सोशल मीडियावर यावर खोचक पोस्ट केली आहे. हा मुद्दा चर्चेत आलेला असताना काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी या १५ जागांबाबत नेमकं काय ठरलंय? याबाबत माहिती दिली.

२६ मतदारसंघांत ‘शिवसेना विरुद्ध शिवसेना’ सामना रंगणार! ठाकरे-शिंदेंकडून उमेदवारांच्या पहिल्या याद्या जाहीर

विदर्भात काँग्रेस ४२ जागा लढवणार!

“आमचं २७० जागांवर एकमत झालं. ८५-८५-८५ जागांबाबत निर्णय झाला. प्रत्येकी ८५ म्हणजे २५५ जागा. मित्रपक्षांसाठी आम्ही काही जागा सोडल्या आहेत. काही जागा आपापसांत बदल करण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे. हे जागावाटप करताना आकडे कुणाला किती मिळाले यावर आम्ही गेलो नाही. आम्ही मेरिटवर गेलो. कुणी किती जागा लढवाव्यात यावर आमचा कुठेही आग्रह नव्हता. आम्ही फक्त मेरिटवर चर्चा केली. त्यामुळेच विदर्भात आम्ही ४२ ते ४३ जागा लढत आहोत”, असं वडेट्टीवार म्हणाले.

वरच्या १५ जागांचं काय?

“वरच्या १५ कोणताही सस्पेन्स नाही. त्यातल्या जागा आम्ही अदलाबदली करणार आहोत. त्यामुळे आम्ही त्यावर काही बोलू शकलो नाही. मित्रपक्षांचा काही जागांसाठी आग्रह आहे. त्यामुळे त्या जागा आम्ही सध्या बाजूला ठेवल्या आहेत. पण वरच्या १५ जागांमध्ये नक्कीच काँग्रेसचा वाटा जास्त राहील. काँग्रेसच्या जागा साधारण १०० ते १०५ च्या दरम्यान राहील. पण आकडा किती असावा यापेक्षा मेरिटवर जागावाटप हा महत्त्वाचा मुद्दा होता”, असंही वडेट्टीवार यावेळी म्हणाले.

मराठीतील सर्व निवडणूक २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mva seat sharing formula vijay wadettiwar on maharashtra assembly election 2024 pmw