MVA Seat Sharing : महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक जाहीर झाली आहे, महाराष्ट्रात आचारसंहिताही लागू झाली आहे. निवडणूक पार पडण्यासाठी जेमतेम २९ दिवस राहिले आहेत. तरीही महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा तिढा सुटलेला नाही. काही जागांवर शिवसेना (उद्धव ठाकरे) आणि काँग्रेस या दोन पक्षांमध्ये पेच निर्माण झाला आहे. संजय राऊत यांनीही काँग्रेसला सुनावत त्यांनी जर मुंबईत निर्णय घेतला तर जागावाटप लवकर होईल असं म्हटलं होतं. तसंच महाराष्ट्रातल्या काँग्रेस नेत्यांना निर्णय घेण्याचा अधिकार नाही असंही म्हटलं होतं. यानंतर काँग्रेस एक बैठक पार पडली आहे. या बैठकीनंतर रमेश चेन्निथला यांनी महत्त्वाची माहिती दिली.
काय म्हणाले रमेश चेन्निथला?
“२२ ऑक्टोबर ला तीन वाजता मुंबईत महाविकास आघाडीची बैठक होईल. त्यानंतर २५ तारखेला आमची एक बैठक होईल. महाविकास आघाडीच्या सर्व जागांचा तिढा सुटेल आणि आम्ही जागावाटप जाहीर करु” असं चेन्निथला म्हणाले. तसंच आजच्या बैठकीत आम्ही ६३ जागांबाबत चर्चा केली. त्याबाबत अंतिम निर्णय झाल्यानंतर त्याची माहिती माध्यमांना दिली जाईल. मुंबईत आम्ही आमच्या मित्रपक्षांशी चर्चा केल्यानंतर यादी जाहीर करु असंही चेन्निथला म्हणाले.
हे पण वाचा- Sanjay Raut : भाजपाबरोबर जाण्याच्या चर्चांवर संजय राऊत म्हणतात, “आम्ही त्यांच्याशी हातमिळवणी…”
आमच्यात कुठलेही मतभेद नाहीत
महाराष्ट्र विधानसभेच्या दृष्टीने आमची चांगली तयारी चालली आहे. जागांबाबत आमची चर्चा सुरु आहे. तसंच आमच्यात कुठलेही मतभेद किंवा वाद नाहीत. राहुल गांधी, प्रियांका गांधी हे देखील प्रचार करतील असंही चेन्निथला यांनी म्हटलं आहे. आघाडी म्हटलं की अशा प्रकारच्या काही गोष्टी होत असतात. पण आमचा अंतिम निर्णय २५ तारखेपर्यंत होईल असंही चेन्निथला यांनी स्पष्ट केलं.
बाळासाहेब थोरात यांनी काय म्हटलं आहे?
आम्ही साधारण ९६ जागांवर चर्चा केली. तसंच लवकरच अंतिम निर्णयापर्यंत आम्ही येऊ. त्याचप्रमाणे मतदार याद्यांमध्ये फेरफार करण्याचा जो मुद्दा आहे तो गंभीर आहे त्याबाबत आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. निवडणूक आयोग काय कारवाई करणार ते पाहू असं बाळासाहेब थोरात म्हणाले आहेत.
शिवसेना (उद्धव ठाकरे), काँग्रेस, आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) या तिन्ही पक्षांमध्ये काही जागांवरुन पेच आहे. आज सकाळी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिलेल्या माहितीनुसार ७ ते ८ जागांवरचाच तिढा उरला आहे. २२ ऑक्टोबरच्या (मंगळवार) बैठकीत यावर अंतिम निर्णय होईल अशी चिन्हं आहेत.