राजस्थानमधील विधानसभा निवडणुकीसाठी २५ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. प्रचाराचे शेवटचे दोन दिवस बाकी आहेत. अशा वेळी राजस्थानची निवडणूक दोन महत्त्वाच्या मुद्द्यांभोवती फिरत असल्याचे दिसते. राज्याचे कॅबिनेट मंत्री व मुख्यमंत्री अशोक गहलोत यांचे निष्ठावंत शांती धारीवाल यांनी मागच्या वर्षी राज्यातील महिलांचा अवमान करणारे वक्तव्य केले होते, त्यावरून राज्यातील वातावरण तापले आहे. दुसरे म्हणजे मुख्यमंत्री गहलोत यांचा मुलगा वैभव याने केलेली कथित टिप्पणी. माझ्या वडिलांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस सरकार पुन्हा सत्तेत येणार नाही, असे वक्तव्य खुद्द मुख्यमंत्र्यांच्या मुलाने केल्यामुळे विरोधकांना आयता मुद्दा मिळाला. हे दोन मुद्दे राजस्थानमधील निवडणूक प्रचाराचे वैशिष्ट्य कसे बनले?
धारीवाल यांचे विधान आणि त्यानंतर झालेला वाद
मागच्या वर्षी आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या दुसऱ्या दिवशी (९ मार्च २०२२) धारीवाल राजस्थान विधानसभेत बोलत असताना म्हणाले की, राजस्थान मर्दांचे राज्य असल्यामुळेच इथे सर्वाधिक बलात्कार होतात. राज्यात नवे पोलिस ठाणे आणि कारागृह निर्माण करण्यासाठी विधानसभेत चर्चा होत असताना विधी आणि कायदे व्यवहारमंत्री असलेल्या धारीवाल यांनी हे वक्तव्य केले. ते म्हणाले, “बलात्कारात राजस्थानचा प्रथम क्रमांक आहे. त्यात कोणतीही शंका नाही.” यावेळी त्यांनी सभागृहात त्यांच्या मागे बसलेल्या आमदारांकडे पाहत म्हटले, “राजस्थान मर्दांचा प्रदेश आहे. त्याचे काय करायचे?” धारीवाल यांच्या वक्तव्यानंतर सत्ताधारी आमदारांमध्ये हशा पिकला.
हे वाचा >> भाजप कामाच्या नावाने मते मागू शकत नाही! प्रियंका गांधींची टीका
धारीवाल यांच्या भाषणाआधीच विरोधी पक्षाने सभात्याग केला होता. त्यामुळे त्यांच्या वक्तव्यानंतर कोणताही निषेध व्यक्त करण्यात आला नाही. मात्र, दुसऱ्या दिवशी भाजपाचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष सतीश पुनिया यांनी धारीवाल यांच्या वक्तव्याचा निषेध केला. राजस्थानला बलात्कारामध्ये प्रथम क्रमांक असल्याचे म्हणणे हा राज्यातील समस्त महिला वर्गाचा अवमान आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी दिली. “धारीवाल यांच्या वक्तव्यामुळे पुरुषांचीही प्रतिष्ठा धुळीस मिळाली आहे. काँग्रेसकडे थोडी जरी नैतिकता बाकी असेल, तर त्यांनी धारीवाल यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी”, अशीही मागणी पुनिया यांनी केली.
राष्ट्रीय महिला आयोगानेही या वक्तव्याची स्वतःहून दखल घेतली. तर, राजस्थानमधील भाजपा आमदारांनी दुसऱ्या दिवशी सभागृहात गोंधळ घालत राजीनाम्याची मागणी केली. विरोधकांचा पवित्रा पाहून धारीवाल यांनीही आपल्या वक्तव्याबद्दल माफी मागितली.
राजस्थान विधानसभा निवडणुकीसाठी धारीवाल यांना उत्तर कोटा या मतदारसंघातून पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली आहे. त्यावरून भाजपाने वर्षभरापूर्वीचे वक्तव्य पुन्हा एकदा उचलून काँग्रेसला धारेवर धरले आहे. भरतपूर येथे मागच्या आठवड्यात झालेल्या जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही धारीवाल यांचे नाव न घेता, या प्रकरणाचा उल्लेख करून काँग्रेसवर टीका केली होती.
पंतप्रधान मोदी म्हणाले, “महिलांप्रती अश्लाघ्य वक्तव्य करणाऱ्या मंत्र्याला शिक्षा देण्याऐवजी काँग्रेसने त्याला उमेदवारी दिली. दिल्लीतील पक्षश्रेष्ठींनीही त्याला तिकीट देण्याचे मान्य केले. जादूगाराच्या (अशोक गहलोत) लाडक्या मंत्र्याकडे अशी कोणती ‘दुसरी लाल डायरी’ आहे, ज्यामुळे दिल्लीश्वरांनाही त्याच्यापुढे नतमस्तक व्हावे लागले. राजस्थानमध्ये भाजपाचे सरकार आल्यानंतर यामागे कोणते रहस्य आहे, ते उलगडले जाईल, असे वचन मी देतो.”
हे वाचा >> हिंदुत्व अधिक कल्याणकारी योजना; विधानसभा निवडणुका जिंकण्यासाठी भाजपा आणि काँग्रेसची द्विसूत्री
लाल डायरी आणि वैभव गहलोत यांचे वक्तव्य
या वर्षी जुलै महिन्यात लाल डायरीबाबतचा विषय चर्चेत आला. माजी राज्यमंत्री राजेंद्र सिंह गुढा यांनी दावा केला की, गहलोत यांचे निकटवर्तीय धर्मेंद्र राठोड यांच्या घरी २०२० साली धाड पडली होती. तेव्हा गहलोत यांच्या सांगण्यावरून गुढा यांनी राठोड यांच्या घरी जाऊन मोठ्या शिताफीने लाल डायरी हस्तगत केली होती. या वर्षी गहलोत यांनी गुढा यांना राज्यमंत्रिपदावरून बाजूला केल्यानंतर त्यांनी लाल डायरीचा विषय माध्यमांसमोर मांडला. “मी लाल डायरी नष्ट केली की नाही? याची विचारणा गहलोत वारंवार करीत आहेत. मला खात्री आहे, ही लाल डायरी बाहेर आल्यास गहलोत गजाआड होतील”, असे वक्तव्य गुढा यांनी केले होते.
गुढा सध्या शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे गट) तिकीटावर उदयपुर्वती या मतदारसंघातून निवडणुकीला उभे आहेत. २०१९ साली त्यांनी बसपाच्या तिकिटावर या ठिकाणी विजय मिळविला होता.
मागच्या आठवड्यात गुढा माध्यमांशी बोलत असताना त्यांनी लाल डायरी दाखविली आणि त्यातील पानावर लिहिलेला मजकूर काय आहे? याची माहिती माध्यमांना दिली. “वैभव गहलोत (अशोक गहलतो यांचे पुत्र) यांनी सांगितले की, हे सरकार पुन्हा सत्तेत येणार नाही. मी हे लिहून द्यायला तयार आहे की, माझ्या वडिलांचे सरकार पुन्हा येणार नाही. राजेंद्र गुढा हे बोलत नाही. हे खुद्द मुख्यमंत्र्याच्या मुलाचे उदगार आहेत”, असे वक्तव्य लाल डायरी हवेत उंचावत गुढा यांनी केले. मात्र वैभव गहलोत यांनी हे वक्तव्य केले होते का? याबाबत कोणतीही खात्रीशीर माहिती बाहेर आलेली नाही.
आणखी वाचा >> भाजपाकडून फार महत्त्व नाही; पण वसंधुरा राजे त्यांच्या बालेकिल्ल्यात अजूनही ‘राणी’
भाजपा आणि पंतप्रधान मोदी यांनी गहलोत यांच्यावर लाल डायरीच्या विषयावरून खूप टीका केली. खुद्द मुख्यमंत्र्यांच्याच मुलाला वडिलांचे सरकार पुन्हा येणार नाही, याची खात्री वाटते, अशी टीका मोदी यांनी काही सभांमधून केली. “गहलोतजी काय झाले? तुमची जादू तुमच्या मुलावरच चालत नाही का?”, अशा शब्दांमध्ये पंतप्रधान मोदी यांनी नागौरीच्या सभेत गहलोत यांच्यावर टीका केली.