लोकसभा निवडणुकीसाठी देशात एकूण सात टप्प्यात मतदान होणार आहे. यापैकी पहिल्या टप्प्यातील मतदान आज (१९ एप्रल) पार पडले. देशात जवळपास १०२ लोकसभा मतदारसंघांमध्ये आज मतदान झाले. आता कोणत्या मतदारसंघांत किती टक्के मतदान झाले? याची आकडेवारी समोर येत आहे. असे असतानाच नागालँडमध्ये एक वेगळी परिस्थिती पाहायला मिळाली. या राज्यातील तब्बल सहा जिल्ह्यांमध्ये शून्य टक्के मतदान झाले आहे.
नागालँडच्या सहा जिल्ह्यांमध्ये एकाही मतदाराने मतदानाचा हक्क बजावला नाही. त्यामुळे येथील सर्व मतदान केंद्रे दिवसभर ओस पडल्याचे चित्र पाहायला मिळाले. या राज्यातील ईस्टर्न नागालँड पीपल्स ऑर्गनायझेशनने मतदान करण्यावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला मतदारांनी पाठिंबा देत बहिष्कार टाकला. त्यामुळे सहा जिल्ह्यात शून्य टक्के मतदान झाले.
हेही वाचा : ‘काँग्रेस, कम्युनिस्ट हे भाजपाचे एजंट’, ममता बॅनर्जी इंडिया आघाडीवर कडाडल्या
नागालँडमध्ये पूर्वेकडील मोन, तुएनसांग, लोंगलेंग, नोक्लाक, शामटोर आणि किफिरे हे सहा जिल्हे आहेत. आता नागालँडमध्ये सध्या भाजपा सत्तेत आहे. मात्र, या सहा जिल्ह्यांसाठी सरकारने दिलेले आश्वासने पाळले नाहीत, त्यामुळे मतदानावर बहिष्कार टाकला असल्याचे सांगितले जात आहे. नागालँडमधील ईस्टर्न नागालँड पीपल्स ऑर्गनायझेशनने या जिल्ह्यांसाठी स्वतंत्र प्रशासनाची मागणी केलेली आहे. पण हे आश्वासन पाळले जात नसल्यामुळे बहिष्काराचे आवाहन करण्यात आले.
मतदानाच्या आधीच ईस्टर्न नागालँड पीपल्स ऑर्गनायझेशनने मतदानावर बहिष्काराचा इशारा दिला होता. यानंतर आता नागालँड राज्य निवडणूक आयोगाने या संघटनेला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. मात्र, यावर संघटनेने उत्तर देत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा हा निर्णय प्रत्येकाचा वैयक्तिक असल्याचे म्हटले आहे.