नागपूर : शहरातील सहा विधानसभा मतदारसंघांत अनेक वर्षांपासून भाजप आणि काँग्रेस यांच्यातच खरी लढत होत असली तरी बहुजन समाज पक्ष आणि वंचित बहुजन आघाडीनेही यात उडी घेतल्याने सर्व लढती रंजक झाल्या आहेत. बसप अनेक वर्षांपासून नागपूरच्या सहाही मतदारसंघांत उमेदवार देत असून २०१९ पासून वंचितही रिंगणात आहे. या दोन्ही पक्षांनी घेतलेल्या मतांची गोळाबेरीज केली असता प्रमुख पक्षांना यांच्या मतविभाजनाचा कायम फटका बसला किंवा फायदा झाला आहे. त्यामुळे यंदा मतविभाजनाबाबत भाजप आणि काँग्रेस दोन्ही पक्षांनी सावध भूमिका घेतली आहे.

दलित मतदार निर्णायक भूमिकेत

नागपूरच्या सहा विधानसभा मतदारसंघांत दलित मतदारांची संख्या मोठी आहे. उत्तर नागपूर मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव असला तरी इतर मतदारसंघातही दलित मतदार निर्णायक भूमिकेत आहेत. हा मतदार अनेक वर्षे काँग्रेससोबत राहिला. मात्र, बसप आणि वंचितच्या आगमनानंतर हा मतदार त्यांच्याकडे वळला. त्यामुळे भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या विजय आणि पराजयात बसप आणि वंचितचे मतविभाजन महत्त्वाचा घटक ठरतो. महाराष्ट्रात बसपने अनेक वर्षांपासून स्वबळावर निवडणुका लढवल्या आहेत, तर २०१९ पासून वंचित बहूजन आघाडीने उमेदवार देण्यास सुरुवात केली.

हेही वाचा – गडचिरोली : आरमोरीत अखेर काँग्रेसने पत्ते उघडले, माजी आमदाराच्या स्वप्नावर पाणी

या बड्या नेत्यांचा पराभव

२०१४ मध्ये उत्तर नागपूर विधानसभा मतदारसंघातून बसपचे किशोर गजभिये यांनी काँग्रेसपेक्षा अधिक मते घेतली होती. यावेळी भाजपचे डॉ. मिलिंद माने विजयी झाले होते. २०१९ मध्ये डॉ. नितीन राऊत यांचा २० हजार मतांनी विजय झाला होता. यावेळीही बसपचे सुरेश साखरे यांनी २३ हजार तर वंचितचे विनय भांगे यांनी ५५९९ मते घेतली होती. पश्चिम नागपूर मतदारसंघात काँग्रेसचे विकास ठाकरे यांचा केवळ ६ हजार मतांनी विजय झाला. या मतदारसंघातून बसपच्या उमेदवाराने ८४०० मते घेतली होती. या दोन्ही पक्षांमुळे होणारे मतविभाजन टाळण्यावर काँग्रेसकडून भर दिला जाईल, तर मतविभाजनाचा लाभ करून घेण्यावर भाजपचा जोर राहील, असे दिसते.

गिरीश पांडव यांना फटका

२०१९च्या विधानसभा निवडणुकीत दक्षिण नागपूरमधून काँग्रेसचे गिरीश पांडव केवळ ४ हजार मतांनी पराभूत झाले होते. यावेळी बसपच्या उमेदवाराने ५ हजार ६६८ तर वंचितच्या उमेदवाराने ५५८३ मते घेतली होती. मध्य नागपूरमधूनही या दोन्ही पक्षांनी तीन हजारांवर मते घेतली होती. त्यामुळे यावेळी मतविभाजन टाळणे काँग्रेससाठी फायदेशीर ठरणार आहे.

हेही वाचा – काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा बंडाचा झेंडा? पक्षाच्या जातीय गणितावर थेट टीका, म्हणाले…

२०१९च्या निवडणुकीत घेतलेली मते

विधानसभा क्षेत्र – बसप – वंचित
दक्षिण-पश्चिम- ७,६४६ – ८,८२१
दक्षिण नागपूर- ५,६६८ – ५,५८३
पूर्व नागपूर- ५,२८४ – ४,३३८
मध्य नागपूर- १,९७१ – १,६१४
पश्चिम नागपूर- ८,४२७ – उमेदवार नाही
उत्तर नागपूर- २३,३३३ – ५,५९९