महाराष्ट्रात निवडणुकीचा पाचवा टप्पा उरला आहे. तर देशात एकूण तीन टप्पे बाकी आहेत. मात्र प्रचासभांचा धडाका सुरु आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नाशिकमध्ये सभा घेतली. या सभेत नरेंद्र मोदींनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला नकली शिवसेना म्हटलं आहे आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला नकली राष्ट्रवादी म्हटलं आहे. निवडणुकीतनंतर हे दोन पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नाशिकाच्या भाषणात हा दावा केला आहे.
काय म्हणाले नरेंद्र मोदी?
“काँग्रेसची अवस्था अशी आहे की त्यांना विरोधी पक्षातही बसता येणार नाही. त्यामुळेच महाराष्ट्रातले एक नेते आहेत, त्यांनी असा दावा केला आहे की निवडणूक संपल्यावर काँग्रेस पक्षात लहान पक्ष विलीन होतील. तसा सल्लाच या बड्या नेत्याने दिला आहे. कारण त्यांना वाटतं की सगळी दुकानं सुरु आहेत ती एकत्र आली तर काँग्रेस विरोधी पक्षात बसू शकतो. ही यांची अवस्था आहे.” असं नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.
उद्धव ठाकरेंची नकली शिवसेना आणि शरद पवारांची नकली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन होणार
“उद्धव ठाकरेंची नकली शिवसेना आणि शरद पवारांची नकली राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांचं काँग्रेसमध्ये विलीनीकरण होणार हे नक्की आहे. नकली शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन होईल तेव्हा मला सर्वात जास्त आठवण येईल ती बाळासाहेब ठाकरेंची. बाळासाहेब ठाकरे म्हणायचे ज्यादिवशी शिवसेनेची काँग्रेस होताना दिसेल तेव्हा मी माझं दुकान बंद करेन. आता नकली शिवसेनेचं अस्तित्त्व संपणार आहे. नकली शिवसेनेने बाळासाहेब ठाकरेंची स्वप्नं धुळीला मिळवली. बाळासाहेबांना वाटायचं अयोध्येत भव्य राम मंदिर उभारलं जावं, कलम ३७० मागे घेतलं जावं.बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण झालं मात्र आत्ताच्या नकली शिवसेनेला या सगळ्याचा राग येतो आहे.
नकली शिवसेना काँग्रेसच्या पावलावर पाऊल टाकते आहे
काँग्रेसने प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावर बहिष्कार घातला. त्यांच्या पाठोपाठ नकली शिवसेनेही त्यांच्याच पावलावर पाऊल टाकलं. काँग्रेसचे लोक मंदिराबाबत काहीही बोलत आहेत आणि नकली शिवसेना एकदम गप्प आहे. दोन्ही पक्ष पापांचे भागिदार आहेत. महाराष्ट्राला नकली शिवसेना काय आहे ते कळलं आहे. हे नकली शिवसेनेचे लोक काँग्रेसला डोक्यावर घेऊन नाचत आहे जो काँग्रेस पक्ष दिवसरात्र फक्त वीर सावरकरांची निंदा करतो आहे, महाराष्ट्राची स्वाभिमानी आणि राष्ट्रभक्त जनता हे पाहते तेव्हा लोकांच्या मनातला राग खूप वाढतो. नकली शिवसेनेत अहंकार आला आहे. मात्र महाराष्ट्राला काय वाटतं आहे याचं काही देणंघेणं त्यांना नाही. नकली शिवसेनेने काँग्रेसपुढे गुडघे टेकले आहेत. या शिवसेनेला धडा शिकवण्याचा निर्णय महाराष्ट्राच्या जनतेने घेतला आहे. तसंच यांना चारी मुंड्या चीत केलं आहे. असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे.