Nalasopara Vidhan Sabha Election 2024- निवडणुकीच्या आदल्या दिवशी विनोद तावडे हे विरारच्या विवांता हॉटेलमध्ये होते. त्यांनी पैसे वाटप केल्याचा कथित आरोप बविआचे हितेंद्र ठाकूर आणि क्षितिज ठाकूर यांनी केला. मात्र भाजपाने सगळे आरोप फेटाळले आहेत. महाराष्ट्रात मतदान पार पडलं आहे. आता नेमकं काय होणार ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे. ५ लाख ९८ हजार मतदार असलेला नालोसापारा हा सर्वात मोठा मतदार संघ असून त्यात उत्तर भारतीयांचे मते सर्वाधिक आहेत. पालघर लोकसभा मतदारसंघातील नालासोपारा हा विधानसभा मतदारसंघ भाजपाचा गड मानला जातो. लोकसभा निवडणुकीत भाजपाचे डॉ.हेमंत सावरा यांनी याच नालासोपार्यातून ७१ हजार मतांची आघाडी घेऊन खासदारकी मिळवली होती. नालासोपारा मतदार संघात लोकसभेच्या वेळी उत्तर भारतीयांची मते निर्णायक असल्याने शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप या दोघांचा यावर दावा सांगितला जात होता. त्यामुळे हा मतदार संघ मिळविण्यासाठी रस्सीखेच सुरू झाली होती. भाजपाने संपूर्ण नालासोपारा मतदारसंघात आपल्या कार्यकर्त्यांचे जाळे विणले आहे. भाजपाने पूर्वीपासूनच या मतदारसंघावर हक्क सांगितला आहे. त्यामुळे हा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला मानला जातो.
पालघर लोकसभा मतदारसंघाचा भाग
नालासोपारा विधानसभा मतदारसंघ हा पालघर लोकसभा मतदारसंघाचा एक भाग आहे आणि महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यात आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत बविआ पक्षाचे क्षितीज ठाकूर १,४९,८६८ मतं मिळवून विजयी झाले. शिवसेना पक्षाचे प्रदीप रामेश्वर शर्मा यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. विजयाचे अंतर ४३ हजारांहून अधिक मतांचं होतं. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाचे क्षितीज ठाकूर १,१३,५६६ मतं मिळवून विजयी झाले. भाजपा पक्षाचे राजन बाळकृष्ण नाईक यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. विजयाचे अंतर ५४ हजारांहून अधिक मतांचं होतं. . नालासोपारा विधानसभा मतदारसंघाची पुढील निवडणूक २० नोव्हेंबर २०२४ रोजी आहे.
२००९ ला काय घडलं?
२००९ ला नालासोपारा विधानसभा मतदारसंघाची निर्मिती झाली. वसई विधानसभेची त्यावेळी वसई, नालासोपारा आणि बोईसर अशा तीन मतदारसंघात विभागणी करण्यात आली होती. त्यावेळी अवघ्या वयाच्या २६ व्या वर्षी क्षितीज ठाकूर राजकारणाच्या रिंगणात उतरले. त्यावेळी वडील तथा बविआचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर यांच्या मतदारसंघातील लोकप्रियतेचा आणि राजकीय क्षेत्रातील अनुभवाचा फायदा क्षितीज ठाकूर यांना झाला. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत बविआचे क्षितीज ठाकूर विरुद्ध शिवसेनेचे शिरीष चव्हाण अशी लढत झाली. तेव्हा ४० हजार मतांच्या फरकाने क्षितीज ठाकूर यांनी शिवसेनेच्या शिरीष चव्हाण यांना पराभूत केले. त्यावेळी मनसेचे उमेदवार विवेक केळुस्कर यांच्यामुळे शिवसेनेची २० हजार मते मनसेकडे वळली होती. ज्यामुळे शिरीष चव्हाण यांना निवडणुकीत पराभव झाला होता.
भाजपाने राजन नाईक यांना दिली संधी
आता २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत बविआचे क्षितीज ठाकूर आणि भाजपाचे राजन नाईक यांच्यात मुख्य लढत पाहायला मिळणार आहे. मात्र याआधी बविआतील दुसऱ्या क्रमांकाचे नेते समजले जाणारे राजीव पाटील यांच्या बंडाची बरीच चर्चा मतदारसंघात झाली. राजीव पाटील आपल्या समर्थक नगरसेवकांसह भाजपात प्रवेश करणार असून नालासोपारा विधानसभा मतदारसंघात पुतण्या क्षितीज ठाकूर विरोधात उभे राहणार होते. त्यामुळे बविआतील फुटीने सोपाऱ्यातील राजकीय वातावरण बदलेले असते. परंतु आईने भावनिक साद घातल्याने आणि भाऊ हितेंद्र ठाकूर यांच्यामुळे राजीव पाटील यांनी निवडणूक लढवणार नसल्याची अधिकृत घोषणा १९ ऑक्टोबर रोजी केली. या सगळ्यात बविआ समर्थकांमध्ये चलबिचल निर्माण झाली होती. कारण २०२० पासून या महापालिका क्षेत्रात महापालिकेची निवडणूक झालेली नाही. त्यामुळे बविआचे नगरसेवक कोण? याचीच अनेकांना माहिती नाही. अशावेळी विधानसभा निवडणूक लागल्याने क्षितीज ठाकूर रा जकीय, सामाजिक कार्यक्रमांना हजेरी लावून भावनिक साद घालत आहेत. मात्र बंडाच्या संकेतानंतर क्षितीज ठाकूर यांची सीट धोक्यात आली होती. कारण राजीव पाटील बविआतील मोठे नेते होते. परंतु आता त्यांनी माघार घेतल्याने क्षितीज ठाकूर यांचा मार्ग मोकळा झाल्याचं बोललं जातंय.
हे पण वाचा- महाराष्ट्र विधानसभेत २०१९ ला कोणाचे किती आमदार होते? पक्षफुटीनंतरची स्थिती काय? वाचा २८८ आमदारांची यादी
बंडाचे पडसाद कायम आहेत, त्याचा फटका क्षितिज ठाकूर यांना बसू शकतो. दुसरीकडे भाजपकडून राजन नाईक, शिवसेनेचे माजी नगरसेवक असलेले धनंजय गावडे स्वराज्य अभियान पक्षामार्फत त्यांना टक्कर द्यायला उभे ठाकले आहेत. त्यात भाजपही स्थानिक पातळीवर सक्रीय झाली आहे. गावडेंनीही तीन महिन्यांपासून सोपाऱ्यात मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. त्यात उबाठा गटाच्या अनेक शाखा प्रमुखांना आपल्याकडे वळवण्यात ते यशस्वी झाले आहेत. यामुळे नालासोपाऱ्यात उबाठा गटाकडून कुणीच इच्छुक राहिलेले नाही. जिल्हाप्रमुख असणारे पंकज देशमुख हे वसई विधानसभेतून लढण्यास इच्छुक आहेत. मात्र त्यांची बोळवण नालासोपारा मतदारसंघातील उमेदवारीने केली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे क्षितीज ठाकूर यांच्यासमोर असणाऱ्या चौरंगी लढतीचा सामना ते कशा पद्धतीने करतात, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. अशा रीतीने ठाकूर यांना तगडं आव्हान इतर उमेदवारांकडून दिलं जाऊ शकतं हे निश्चित.