Nana Patole : भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांचा पैसे वाटतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या प्रकरणी बहुजन विकास आघाडीने गंभीर आरोप केले आहेत. त्यानंतर या प्रकरणावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचीही प्रतिक्रिया समोर आली आहे. भ्रष्टाचार ही भाजपाची मानसिकता असल्याचं नाना पटोले ( Nana Patole ) यांनी म्हटलं आहे.
बविआचा नेमका आरोप काय?
बविआच्या आरोपानुसार, विनोद तावडे हे मंगळवारी विरार पूर्वेला असणाऱ्या मनोरीपाडा येथील विवांत हॉटेलमध्ये आले होते. त्यावेळी भाजपाचे उमेदवार राजन नाईक आणि भाजपाचे काही पदाधिकारी हॉटेलमध्ये आले होते. त्यांच्यात बैठक सुरु होती. त्यावेळी बविआचे काही कार्यकर्ते हॉटेलमध्ये आले. याठिकाणी पैसे वाटप सुरु असल्याचा आरोप बविआच्या कार्यकर्त्यांनी केला. या राड्यानंतर पोलीस घटनास्थळी आले आणि त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. यावेळी क्षितिज ठाकूरही घटनास्थळी उपस्थित होते. यावेळी दोन्ही बाजूंनी एकमेकांविरुद्ध घोषणाबाजी सुरु होती.
हितेंद्र ठाकूर यांचा दावा काय?
या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला. यानंतर विनोद तावडे यांनी मला २५ वेळा फोन करुन माफी मागितली, असा दावा हितेंद्र ठाकूर यांनी केला. प्रकरण जास्त ताणू नका, असे तावडेंनी सांगितल्याचे ठाकूर यांनी म्हटले. त्याचप्रमाणे मला विनोद तावडे मला सारखे फोन करतायत. मला सोडवा..माझी चूक झाली..मला सोडवा, अशी विनंती विनोद तावडे करत आहेत. विनोद तावडे यांनी मला २५ फोन केले आहेत, असा दावा हितेंद्र ठाकूर यांनी केला आहे. तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Nana Patole ) यांनी भ्रष्टाचार ही भाजपाची मानसिकता आहे असं म्हटलं आहे.
नाना पटोले यांनी काय म्हटलं आहे?
भाजपाची मानसिकता स्पष्ट झाली आहे. भ्रष्टाचार, भ्रष्टाचारातून सत्ता, सत्तेतून पुन्हा भ्रष्टाचार हा यांचा एकमेव अजेंडा आहे. भाजपाचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे पैसे वाटप करत आहेत असा व्हिडीओ समोर आला आहे आणि भाजपाकडून सांगितलं जातं आहे की आमचा काही संबंध नाही. विनोद तावडे भाजपाचे राष्ट्रीय नेते आहेत, भाजपाचे लोक सांगतात आमचा संबंध नाही. या भाजपासारखे खोटारडे लोक पाहिले नाहीत. येनकेन प्रकारे सत्ता काबीज करण्याचा हा प्रयत्न आहे. महाराष्ट्रातली जनता सुजाण आहे, लोकांनी भाजपाचा भ्रष्टाचार पाहिला आहे. पैसे वाटून कसंतरी निवडून येता येईल का? हा प्रकार यांच्या माध्यमातून सुरु होता. भाजपाची अवस्था उलटा चोर कोतवाल को डाँटे अशी आहे. विनोद तावडे तिकडे कशाला गेले होते? त्या हॉटेलमध्ये विनोद तावडे काय करत होते? निवडणुकीचा प्रचार संपला, मग मार्गदर्शन करायला ते गेले कसे काय? विनोद तावडे पाच वाजल्यानंतर त्या हॉटेलमध्ये काय करत होते? निवडणूक आयोगाने या प्रकरणात लक्ष घातलं पाहिजे. मतदारांचं लांगुलचालन भाजपाकडून सुरु आहे असाही आरोप नाना पटोले ( Nana Patole ) यांनी केला आहे.