Nana Patole Mahavikas Aghadi Seat Sharing Formula : “महाविकास आघाडीत चार ते पाच जागांवर मतभेद होते, जे आता मिटले आहेत”, असं वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलं आहे. तसेच आता मविआत कोणत्याही प्रकारचे मतभेद नाहीत, असंही पटोले यांनी सांगितलं. पटोले म्हणाले, “चार ते पाच जागांवर थोडी अडचण निर्माण झाली होती. मात्र, आम्ही काल सर्व पक्षांनी मिळून चर्चा केली व त्यावर तोडगा काढला. महायुतीतील पक्षांनी जागावाटप पूर्ण करून विधानसभा उमेदवारांच्या याद्या देखील जाहीर केल्या आहेत. मात्र मविआ अद्याप एकही यादी जाहीर करू शकलेली नाही. त्यामुळे मविआत सारं काही आलबेल नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळातं रंगत होती. त्यावर मविआतील प्रमुख नेते नाना पटोले यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
महायुतीमधील भारतीय जनता पार्टीने ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. पाठोपाठ एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने ४५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने देखील ४५ उमेदवार जाहीर केले आहेत. वंचित बहुजन आघाडीने उमेदवारांच्या चार याद्या जाहीर केल्या आहेत. मात्र, मविआने अद्याप एकही जागा जाहीर केलेली नाही. तसेच त्यांच्याील जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर केलेला नाही. त्यामुळे मविआमध्ये नेमकं काय चाललंय असा प्रश्न सर्वांना पडला होता. त्यावरही नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पटोले म्हणाले, “उद्या आम्ही आमचं जागावाटप जाहीर करू”.
उद्या जागावाटप जाहीर करणार : नाना पटोले
महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या शुक्रवारी, शनिवारी, रविवारी आणि मंगळवारी महत्त्वाच्या बैठका पार पडल्या. या बैठकांना शिवसेना नेते (ठाकरे) खासदार संजय राऊत, खासदार अनिल देसाई, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, सतेज पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) जितेंद्र आव्हाड, माजी मंत्री राजेश टोपे आणि इतर नेते उपस्थित होते. आतापर्यंत २८० जागांवर एकमत झालं असून उर्वरित जागांचा तिढा सोडवून उद्या (गुरुवार, २४ ऑक्टोबर) जागावाटप जाहीर होईल. आघाडीच्या प्रत्येक मित्रपक्षांकडून किमान १२ जागांचा आग्रह धरण्यात आला आहे. त्यावर महाविकास आघाडीचे नेते काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
हे ही वाचा >> Mahayuti : महायुतीच्या १८२ जागा जाहीर, महाविकास आघाडीचं जागावाटपाचं घोडं अडलेलंच!
मुंबईत शिवसेनेला (ठाकरे) सर्वाधिक जागा मुंबईतील ३६ पैकी ३३ जागांचा तिढा सुटला असून शिवसेना (ठाकरे) १८, काँग्रेस १५ तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) २ जागा लढणार आहे. समाजवादी पक्षाला १ जागा देण्याचं निश्चित झालं असून कुर्ला, भायखळा आणि अणुशक्तीनगर या जागांवर पेच असल्याची चर्चा आहे