निवडणूक आयोगाच्या चुकांमुळे महाराष्ट्रातील मतदानाची टक्केवारी कमी झाली, असा थेट आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. तसेच मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी पहिल्या टप्प्यानंतर निवडणूक आयोगाला पत्र लिहिले होते, अशी माहिती त्यांनी दिली. देशात सोमवारी पाचव्या टप्प्यातील मतदान पार पडले. यावेळी सर्वात कमी मतदान महाराष्ट्रात झाल्याचं बघायल मिळालं. यावरूनच नाना पटोले यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नाना पटोले यांनी सोमवारी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी मतदानाच्या कमी टक्केवारीवरून नाराजी व्यक्त केली. तसेच मतदानाची टक्केवारी कमी होण्याला निवडणूक आयोग जबाबदार आहे, असा आरोपही त्यांनी केला.

हेही वाचा – शरद पवारांचं वक्तव्य, “पंतप्रधान नरेंद्र मोदी मला भटकती आत्मा म्हणाले कारण ते..”

नेमकं काय म्हणाले नाना पटोले?

“पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडलं, तेव्हा आमच्या लक्षात आलं की उन्हामुळे मतदानाचे प्रमाण कमी होत आहे. त्यानंतर उन्हापासून वाचण्यासाठी मतदान केंद्रासमोर ग्रीन शेड लावावे, तसेच मतदान केंद्रांवर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, अशी विनंती करणारं आम्ही पत्र निवडणूक आयोगाला दिले होते. मात्र, आयोगाने आमच्या पत्राची दखल घेतली नाही. आयोगाने जर आमच्या पत्राची दखल घेतली असती, तर आज मतदानाची टक्केवारी आणखी वाढली असती”, अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली.

“निवडणूक आयोगाच्या चुकांमुळे मतदानाची टक्केवारी कमी”

पुढे बोलताना, “आता पाचव्या राज्यातील शेवटच्या टप्प्यातील मतदान पार पडले असून या टप्प्यातही मतदानाचा टक्का कमी झाला आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या चुकांमुळे ही मतदानाची टक्केवारी कमी झाली आहे”, असा आरोप त्यांनी केला.

हेही वाचा – “जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभेची निवडणूक होणार, राज्याला लवकरच…”, पंतप्रधान मोदींच्या तीन मोठ्या घोषणा

पाचव्या टप्प्यात महाराष्ट्रात ४८.६६ टक्के मतदान

दरम्यान, सोमवारी देशात लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान पार पडलं. यावेळी सर्वात कमी मतदान महाराष्ट्रात झाल्याचे बघायला मिळालं. महाराष्ट्रातील १३ मतदारसंघांत सायंकाळी ५ वाजेपर्यंत ४८.६६ टक्के मतदान झालं. यामध्ये भिवंडी-४८.८९, धुळे-४८.८१, दिंडोरी-५७.०६, कल्याण-४१.७०, मुंबई उत्तर-४६.९१, मुंबई उत्तर मध्य-४७.३२, मुंबई उत्तर पूर्व-४८.६७, मुंबई उत्तर पश्चिम-४९.७९, मुंबई दक्षिण ४४.२२, मुंबई दक्षिण मध्य-४८.२६, नाशिक-५१.१६, पालघर-५४.३२ आणि ठाण्यात ४५.३८ टक्के मतदान झालं.