ऑल इंडिया पर्सनल लॉ बोर्डाचे प्रमुख सज्जाद नोमानी यांनी काल महाविकास आघाडीला समर्थन जाहीर केलं होते. यासंदर्भात बोलताना, धर्माचा वापर करून महाविकास आघाडीची नेते वोट जिहाद करत आहेत. निवडणुकीच्या काळात इतके लांगुलचालन यापूर्वी कधी बघितले नव्हते. अशी टीका राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. दरम्यान, या टीकेलाच आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. आज माध्यमांशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय म्हणाले नाना पटोले?

“एखादी मुस्लीम संघटना एखाद्या पक्षाला मतदान करण्यासाठी आवाहन करत असेल, तर यात गैर काय? अशाप्रकारे आवाहन करणे चुकीचं असेल तर मग आरएसएस सुद्धा धार्मिक संघटना आहे. ही संघटना भाजपाचा प्रचार करते. त्याचं काय? भाजपाचे अध्यक्ष जेपी नड्डा म्हणतात, की त्यांना आरएसएसची गरज नाही. मग आरएसएस लोक कशाला प्रचारासाठी मैदानात उतरतात? याचं उत्तर आधी देवेंद्र फडणवीस यांनी द्यावं”, असं प्रत्युत्तर नाना पटोले यांनी दिलं.

हेही वाचा – “धर्माचा वापर करून महाविकास आघाडीचे प्रमुख नेते वोट जिहाद करत आहेत”, फडणवीस यांची टीका

“निवडणूक आली की भाजपाचे नेते हिंदू मुस्लीम करतात”

“आम्हाला पत्र खूप येतात, पण त्या पत्रातल्या कोणत्या अटी मान्य करायच्या, कोणत्या नाही. हे आम्हाला ठरायचं आहे. जेव्हा जेव्हा निवडणूक येते. तेव्हा तेव्हा भाजपाने नेते हिंदू मुस्लीम करतात. पण ज्यावेळी ईद येते, त्यावेळी हेच नेते मुस्लिमांकडे जाऊन बिर्याणी खातात. त्यामुळे या पद्धतीच्या चर्चा आता भाजपाच्या नेत्यांनी थांबवल्या पाहिजे. त्यांनी हिंदू-मुस्लीम करून महाराष्ट्राची एकता तोडू नये”, असं नाना पटोले म्हणाले.

हेही वाचा – अमित शहांच्या गडचिरोली दौऱ्याआधी भामरागडमध्ये बॉम्बस्फोट, सुदैवाने…

देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले होते?

दरम्यान, सज्जाद नोमानी यांच्या आवाहनावर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीला लक्ष्य केलं होतं. उलेमा कौन्सिलने महाविकास आघाडीला १७ मागणीचे पत्र दिले आहे. या मागण्या इतक्या भयानक आहे की त्यात दहा टक्के आरक्षण देण्याची मागणी करण्यात आली आहे. शिवाय देशावर व राज्यात जे दंगे भडकविण्यात आले होते अशा दंग्यातील जे मुस्लिम आरोपी आहे त्यांच्यावरील केसेस परत घ्या आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घाला अशी मागणी त्यात करण्यात आली आहे्. महाविकास आघाडीला उलेमा बोर्डाने दिलेल्या मागण्या महाविकास आघाडीने त्या मान्य केल्यानंतर उलेमा बोडार्ने त्यांना पाठिंबा दिला आहे. मुस्लिमांची मते मिळावी यासाठी महाविकास आघाडी कुठल्या स्तरावर जाऊ शकतात. महाविकास आघाडीचे व्होट जिहाद सुरू केल आहे. एका धर्माला हाताशी धरुन ज्या पद्धतीने महाविकास आघाडी राजकारण करत आहे. त्याला निश्चितपणे आम्ही उत्तर देऊ. राज्यातील जनतेने सावध राहून मतदान करण्याची वेळ आली आहे. सर्वाना एक व्हावे लागेल तरच देश सुरक्षित राहील, असे फडणवीस म्हणाले होते.

मराठीतील सर्व निवडणूक २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nana patole replied to devendra fadnavis sajjad nomani letter mva support spb