Nana Patole : महाविकास आघाडीत जुंपली? हरियाणातील पराभवानंतर राऊतांची काँग्रेसवर टीका; पटोले एकेरी उल्लेख करत म्हणाले, “वेळ आली की…”

Nana Patole vs Sanjay Raut : हरियाणा निवडणुकीतील काँग्रेसच्या पराभवावरून राऊतांनी टीका केली होती.

sanjay raut nana patole
हरियाणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने ३७ तर भाजपाने ४८ जागा जिंकल्या आहेत. (लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Nana Patole Remark on Sanjay Raut as Shivsena MP Criticize Congress : हरियाणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा विजय होईल, अशी अटकळ राजकीय तज्ज्ञ आणि एग्झिट पोल्सनी वर्तवली होती. परंतु, या सर्व शक्यता खोट्या ठरवत भाजपाने अनपेक्षितपणे विजय मिळवला आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीपेक्षाही भाजपाने यावेळी अधिक जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवलं आहे. राज्यात भाजपाने ४८, काँग्रेसने ३७, लोकदलाने २ जागा जिंकल्या आहेत. तसेच तीन अपक्ष उमेदवारांनी देखील निवडणूक जिंकली आहे. या विजयानंतर काँग्रेसच्या कारभारावर टीका होत आहे. तसेच काँग्रेसच्या परभवाचं विश्लेषण केलं जात आहे. अशातच, काँग्रेसचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेचे (ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी देखील काँग्रेसच्या कारभारावर बोट ठेवलं आहे. राऊतांनी काँग्रेसबाबत केलेल्या टिप्पणीवर काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीदेखील संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

नाना पटोले म्हणाले, “संजय राऊत काय बोलतो काय लिहितो त्याकडे आम्ही लक्ष देत नाही आणि राहिला प्रश्न हरियाणा निवडणुकीच्या निकालाचा तर त्याचा महाराष्ट्रावर कोणताही परिणाम होणार नाही. दोन्ही राज्ये वेगवेगळी आहेत. येथील परिस्थिती वेगळी आहे. हरियाणा व महाराष्ट्रातील फरक कोणाला कळत नसेल तर तो त्यांचा विषय आहे”.

हे ही वाचा >> Rajapur Assembly Constituency: राजापूरच्या जागेसाठी महाविकास आघाडीत बिघाडी? अविनाश लाड यांचा मतदारसंघावर दावा

प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधिंनी संजय राऊत यांच्या एका वक्तव्यावर नाना पटोले यांना प्रतिक्रिया विचारली. राऊत म्हणाले होते की “जिंकलेल्या डावाचं पराभवात कसं रूपांतर करायचं हे काँग्रेसकडून शिकायला हवं”. यावर पटोले म्हणाले, “मी त्यावर फार बोलणार नाही. वेळ आल्यावर मी बोलेन”.

मुख्यमंत्र्यांची तब्येत एकाएकी कशी काय खराब झाली? पटोलेंचा प्रश्न

निवडणुकांच्या निकालांबाबत पटोले यांना विचारले असता पटोले म्हणाले, “मी योग्य वेळी योग्य प्रतिक्रिया देईन. परंतु, जे होतं ते चांगल्यासाठीच होतं, असं समजून आम्ही पुढे जात आहोत. प्रसारमाध्यमांनी महाविकास आघाडी इतकच महायुतीकडे देखील लक्ष द्यायला हवं. तिकडे जास्त धुसफूस आहे. मुख्यमंत्र्यांची तब्येत एकाएकी कशी काय खराब होते? त्याची कारणं तुम्ही शोधायला हवीत”.

हे ही वाचा >> Eknath Shinde : “लाडकी बहीण योजनेवरुन आशा भोसलेंनी सावत्र भावांना चपराक…”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य

संजय राऊत काय म्हणाले होते?

शिवसेनेचे (ठाकरे) खासदार म्हणाले होते, “हरियाणातील पराभव दुर्दैवी आहे. हरियाणात काँग्रेसने एकट्याने लढण्याऐवजी इंडिया आघाडी म्हणून निवडणूक लढवायला हवी होती. कदाचित वेगळे निकाल लागले असते. काँग्रेसने समाजवादी पार्टी, आम आदमी पार्टी, शिवसेना (ठाकरे), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) या पक्षांना आपल्याबरोबर घेऊन निवडणूक लढवायला हवी होती. या सगळ्याचा परिणाम म्हणून निश्चितच इंडिया आघाडी जिंकली असती. काँग्रेसला वाटलं की आम्ही एकतर्फी ही निवडणूक जिंकू, आम्हाला कोणाची गरज नाही. अनेक एक्झिट पोल्सही तसंच सांगत होते. तरीदेखील काँग्रेसला हा पराभव पाहावा लागतोय, हे दुर्दैवी आहे. यातून बऱ्याच गोष्टी शिकता येतील. त्यामुळे कोणीही स्वतःला मोठा भाऊ किंवा छोटा भाऊ समजू नये. तसेच लोकसभेचं यश हे इंडिया आघाडीचं यश आहे हे लक्षात घ्यावं.

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Nana patole slams sanjay raut criticize congress over haryana election result 2024 asc

First published on: 09-10-2024 at 23:20 IST
Show comments