Nanded Bypoll Election Result 2024 : राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालाची मतमोजणीला सुरुवात झाली आहे.तर दुसरीकडे नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी देखील आज होत आहे. सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणी सुरु झाली आहे. या निकालानंतर मराठवाड्यातील नांदेड लोकसभा मतदारसंघातील मतदार भाजप की काँग्रेस नेमकं कोणाच्या बाजूने कौल देते हे स्पष्ट होईल. लोकसभा निवडणुकीत पराभवानंतर पोटनिवडणुकीत मतदार भाजपा उमेदवाराला संधी देतात की पुन्हा काँग्रेसचा उमेदवार निवडणुक आणतात का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
लोकसभेच्या सार्वत्रिक (मे २०२४) निवडणुकीत नांदेड मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार वसंतराव चव्हाण विजयी झाले होते, त्यांनी भाजपचे उमेदवार प्रतापराव चिखलीकर यांचा पराभव केला होता. मात्र अवघ्या तीन महिन्यात २६ ऑगस्टला वसंतराव चव्हाण यांचे निधन झाले. त्यामुळे ही पोटनिवडणूक झाली होती यात काँग्रेसने वसंतराव चव्हाण यांचे पुत्र रवींद्र चव्हाण निवडणुकीच्या रिंगणात उतरवले, तर भाजपाकडून त्यांच्याविरोधात डॉ. संतुकराव हंबर्डे उमेदवार आहेत. नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत एकूण १९ उमेदवारांचे भवितव्य आज पणाला लागले आहे. पण यात मुख्य लढत काँग्रेस आणि भाजपमध्ये होत आहे.
नांदेड लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांची मोठी पकड आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांपासून लोकसभेपर्यंत सर्व निवडणुकांमध्ये चव्हाण कुटुंबाचे वर्चस्व आहे. पण फेब्रुवारी २०२४ मध्ये अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश करताच काँग्रेसचे वर्चस्व कमी होतेय की काय अशी शक्यता वर्तवली जात होती, मा्त्र वसंतराव चव्हाण यांच्या विजयाने सर्वांनाच मोठा राजकीय धक्का बसला. त्यामुळे या निवडणुकीत अशोक चव्हाण यांची प्रतिष्ठ पणाला लागली आहे. मतदार काँग्रेस उमेदवाराला सहानुभूतीची मत देतात की, या जागेवर भाजप ला पुन्हा विजय मिळवता येतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
सध्या नांदेडमधील सहाही विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार आहेत. त्यामुळे लोकसभेतही काँग्रेस पक्षाचेच वर्चस्व असेल का काही वेळात स्पष्ट होईल.