Narayan Rane : महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक पार पडली आहे. आता सगळ्या महाराष्ट्राला प्रतीक्षा आहे ती निकालांची. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकालामध्ये कुणाची सरशी होणार? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. निवडणूक पार पडल्यानंतर जे एक्झिट पोल समोर आले आहेत त्यांनी महायुतीची सत्ता येईल असं म्हटलं आहे. तर दोन ते तीन एक्झिट पोल्सनी महाविकास आघाडीची सत्ता येईल असं म्हटलं आहे. काय होतं ते २३ नोव्हेंबरला समजणार आहे. दरम्यान भाजपाचे खासदार आणि ज्येष्ठ नेत्याने शरद पवार महायुतीसह येऊ शकतात असा दावा केला आहे. त्यानंतर आता नेमकं काय होणार याची चर्चा सुरु झाली आहे.
महाराष्ट्रात महायुती विरुद्ध महाविकास आघाडीचा सामना
महाराष्ट्रात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना पार पडला आहे. या सामन्यात विजयी कोण होणार? याचा निकाल २३ नोव्हेंबरला म्हणजेच आता काही तासांमध्येच लागणार आहे. त्यामुळे या निकालाकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. महाराष्ट्रात महायुतीचं सरकार हे महाविकास आघाडीचं सरकार पडल्यानंतर आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या दोन्ही पक्षांना खिंडार पडलं आहे. यानंतर जी लोकसभा निवडणूक पार पडली त्यात महाविकास आघाडीला यश मिळालं. तर विधानसभा निवडणुकीचा निकाल लागण्यासाठी काही तास उरले आहेत. अशातच भाजपाच्या ज्येष्ठ नेत्याने ( Narayan Rane ) शरद पवारही महायुतीसह येऊ शकतात असा दावा केला आहे.
Narayan Rane on Uddhav Thackrey: “बारसू रिफायनरी करणारच, कुंडली काढून..”, नारायण राणेंचा हल्लाबोल
नारायण राणे काय म्हणाले आहेत?
शरद पवार धूर्त नेते आहेत. कुठल्याही क्षणी त्यांच्या पक्षाच्या आमदारांच्या हिताचा निर्णय शरद पवार घेऊ शकतात. असं नारायण राणे ( Narayan Rane ) यांनी म्हटलं आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना रस्त्याने चालणं कठीण होईल. संजय राऊत यांनी शिवसेनेची वाट लावली. आता शिवसेनेचं पूर्वीसारखं वर्चस्व राहिलेलं नाही. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना फक्त दोन दिवस मंत्रालयात गेले, अशी टीकाही नारायण राणे ( Narayan Rane ) यांनी केली आहे. एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत नारायण राणेंनी ( Narayan Rane ) हे वक्तव्य केलं आहे.
महायुतीला लोकांनी कौल दिला आहे
महायुतीला लोकांनी कौल दिला आहे, लोकांना हेच वाटतं आहे की महायुतीचं सरकार आलं पाहिजे. महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर जे मुख्यमंत्री होते आणि जे मंत्री होते त्या सराकारने महाराष्ट्राला मागे घेऊन जाण्याचं काम केलं. विरोधकांवर टीका, वागणूक वाईट देणं, सूडाचं राजकारण करण्यात आलं. मात्र महायुतीचं सरकार तसं नाही. महाराष्ट्रात एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी चांगलं काम केलं आहे. महाराष्ट्रात जातीय दंगली, तेढ, प्रक्षोभ निर्माण झाला नाही. त्यामुळे महायुतीचं सरकार येईल असं मला वाटतं असं नारायण राणे ( Narayan Rane ) यांनी म्हटलं आहे.