लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला आता वेग आला आहे. मतदानाचे दोन टप्पे पार पडले असून अद्याप पाच टप्प्यांमधील मतदान बाकी आहे. सर्व पक्ष निवडणुकीचा जोरदार प्रचार करत आहेत. प्रचाराच्या बाबतीत भारतीय जनता पार्टी आघाडीवर असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी देशभर भाजपा उमेदवारांचा प्रचार करत आहेत. या प्रचारादरम्यान ते काँग्रेससह इंडिया आघाडीवर टीका करत आहेत. मोदी यांनी यावेळी प्रचारादरम्यान काँग्रेसवर गंभीर आरोपही केले आहेत. काँग्रेस देशातील लोकांची संपत्ती गोळा करून जास्त मुलं असलेल्या लोकांना वाटेल, ओबीसींचं आरक्षण कमी करून ते मुसलमानांना देईल, असे दावे मोदी यांनी त्यांच्या भाषणांमधून केलेले असताना आज (२ मे) त्यांनी काँग्रेसला तीन आव्हानं दिली आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमधील आनंद येथील प्रचारसभेला संबोधित केलं. यावेळी ते म्हणाले, माझी काँग्रेसला तीन आव्हानं आहेत, काँग्रेससह त्यांच्या संपूर्ण इकोसिस्टीमने ही आव्हानं स्वीकारून दाखवावीत. माझं पहिलं आव्हान आहे की काँग्रेस आणि त्यांच्या बगलबच्चांनी या देशाला लिखित स्वरूपात गॅरंटी द्यावी की ते आपल्या देशाचं संविधान बदलून धर्माच्या आधारावर मुसलमानांना आरक्षण देणार नाहीत, देशाची फाळणी करणार नाहीत.

माझं दुसरं आव्हान आहे की काँग्रेसने नागरिकांना लिहून द्यावं की ते अनुसूचित जाती (एससी), अनुसूचित जमाती (एसटी) आणि इतर मागासवर्गांना (ओबीसी) दिलेलं आरक्षण कमी करणार नाहीत, त्यात कुठल्याही प्रकारचा मोडता घालणार नाहीत. त्यांचे अधिकार हिरावणार नाही, त्यांच्या आरक्षणावर दरोडा टाकणार नाही. माझं काँग्रेससह इंडी आघाडीला तिसरं आव्हान आहे की, त्यांनी देशाला लिखित स्वरूपात गॅरंटी द्यावी की ज्या ज्या राज्यात काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांचं सरकार आहे. तिथे ते कधीही मतांचं (व्होटबँकेचं) राजकारण करणार नाहीत. आरक्षणातील ओबीसींचा वाटा कमी करून मागल्या दाराने मुसलमानांना आरक्षण देणार नाहीत.

हे ही वाचा >> “इकडं काँग्रेस मरतंय, तिकडं पाकिस्तान यांच्यासाठी रडतंय”, पंतप्रधान मोदींची टीका; म्हणाले, “राहुल गांधींना…”

नरेंद्र मोदी म्हणाले, काँग्रेसने माझी ही तीन आव्हानं स्वीकारून दाखवावित. काँग्रेसच्या युवराजांमध्ये (राहुल गांधी) हिंमत असेल तर त्यांनी हे करून दाखवावं. नुसतं संविधानाला डोक्यावर घेऊन नाचून काहीच होणार नाही. संविधानासाठी जगणं आणि मरणं काय असतं ते शिकायचं असेल तर मोदीकडे या. मला माहिती आहे काँग्रेस माझी ही तीन आव्हानं कधीच स्वीकारणार नाही, कारण त्यांचे हेतू घाणेरडे आहेत.

मराठीतील सर्व निवडणूक २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Narendra modi 3 challenges to congress indi alliance for lok sabha election 2024 asc