भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने नुकताच त्यांचा लोकसभा निवडणुकीचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. यावर भाष्य करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या जाहीरनाम्यावर मुस्लीम लीगची छाप असल्याचं वक्तव्य केलं होतं. पाठोपाठ मोदी म्हणाले, “काँग्रेस सत्तेत आली, तर जनतेचा पैसा जास्त मुलं असणाऱ्यांना वाटून टाकेल. काँग्रेस आणि इंडिया आघाडीचा देशातील जनतेच्या कमाईवर डोळा आहे. कोण किती कमावतो, कुणाकडे किती संपत्ती आहे, कुणाकडे किती पैसे आणि घरे आहेत, याचा तपास केला जाईल, असे काँग्रेसचा शहजादा म्हणतो. तो पुढे म्हणतो की, सरकार अशा श्रीमंतांच्या संपत्तीचा ताबा घेईल आणि ती सर्वांना वाटून टाकेल. आपल्या माता-भगिनींकडे असलेले सोने हे स्त्रीधन मानले जाते, ते पवित्र मानले जाते. तुमच्या मंगळसूत्रावरही त्यांचा डोळा आहे. ही गोष्ट फारच लज्जास्पद आहे. आधी जेव्हा काँग्रेसचे सरकार होते, तेव्हा त्यांनी सांगितले होते की, देशाच्या संपत्तीवर पहिला अधिकार मुस्लिमांचा आहे. याचा अर्थ हे संपत्ती गोळा करून कुणाला वाटणार? तर ज्यांना जास्त मुले आहेत त्यांना वाटणार, घुसखोरांना वाटणार. तुमच्या कमाईचा पैसा घुसखोरांना दिला जावा का?
पंतप्रधान मोदी यांच्या या वक्तव्यानंतर त्यांच्यावर विरोधकांनी जोरदार टीका केली. या टीकेवर आणि मोदी यांनी व्यक्त केलेल्या भीतीवर आज (२९ एप्रिल) त्यांनी स्वतःच सविस्तर प्रतिक्रिया दिली. नेटवर्क १८ ला दिलेल्या मुलाखतीत मोदी म्हणाले, प्रसारमाध्यमांनी माझा लोकसभा निवडणुकीचा प्रचार नीट पाहिलेला दिसत नाही. मी विकासाच्या मुद्द्यावर बोलतोय. परंतु विकासाच्या गोष्टी कदाचित तुमच्या टीआरपीत बसत नसतील. तुम्ही पाहिलं असेल माझा निवडणुकीचा प्रचार प्रामुख्याने दोन गोष्टींवर केंद्रित आहे. एक म्हणजे आम्ही समाजकल्याणासाठी काय काम केलं. दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही विकासकामांवर बोलतोय. आमचा प्रचार आणि इतर सरकारांच्या प्रचारांमधला एक महत्त्वाचा फरक म्हणजे आम्ही शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचलो आहोत.
पंतप्रधान मोदी म्हणाले, सत्तेत येणारं प्रत्येक सरकार हे चांगलीच धोरणं बनवत असतं. कुठल्याही सरकारला वाईट धोरणं बनवून लोकांचं नुकसान करण्याची इच्छा नसते. काही लोकांच्या मनात चांगली धोरणं असतात, पण ती त्यांना सत्यात उतरवता येत नाहीत. आम्ही सत्तेवर आल्यानंतर गरिबांसाठी चार कोटी घरं बांधली आणि ज्यांची घरं बांधायची राहिली असतील त्यांची नावं आम्हाला पाठवा असं आवाहनही आम्ही केलं आहे. म्हणजेच माझा पंतप्रधानपदाचा तिसरा कार्यकाळ सुरू झाल्यावर मी त्या उरलेल्या लोकांनाही घरं बांधून देणार आहे. आता मला तीन कोटी घरं बांधायची आहेत. ‘आयुष्मान भारत’सारखी योजना आम्ही राबवली. यासारख्या अनेक योजना तयार केल्या आणि राबवल्या. किंबहुना त्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवल्या.
राहिला प्रश्न काँग्रेसच्या जाहीरनाम्याचा तर, मुळात निवडणुकीचे जाहीरनामे या काही शोभेच्या वस्तू नसतात. प्रसारमाध्यमांनी त्याचं विश्लेषण करायला हवं. त्यातल्या बारीक-सारीक मुद्द्यांचा अभ्यास करायला हवा, तपास करायला हवा. काँग्रेसने जेव्हा त्यांचा निवडणुकीचा जाहीरनामा प्रसिद्ध केला तेव्हा मी वाट पाहत होतो की आपली माध्यमं याचा बारकाईने अभ्यास करतील, मी बराच वेळ वाट पाहिली, मीडिया यावर काहीतरी बोलेल पण काहीच झालं नाही. शेवटी मी एक प्रतिक्रिया दिली. मी म्हटलं की या जाहीरनाम्यावर मुस्लीम लीगची छाप आहे. मला वाटलं आता तरी आपली प्रसारमाध्यमं यावर काहीतरी करतील, त्यांना धक्का बसेल. प्रसारमाध्यमांना, राजकीय विश्लेषकांना हे ऐकून धक्का बसेल आणि त्यानंतर ते या जाहीरनाम्याच्या खोलात जातील असं मला वाटलं होतं. कारण या जाहीरनाम्यातून काँग्रेसने जे काही वाढलंय ते धोकादायक होतं परंतु, कोणी काहीच बोललं नाही. निष्पक्षपणे यावर कोणीतरी बोलावं अशी माझी इच्छा होती. पण कोणी बोललं नाही. मी दहा दिवस वाट पाहिली आणि अखेर मलाच सत्य मांडावं लागलं.
हे ही वाचा >> “आमच्या पूर्वजांनी पापं केली असतील म्हणून…”, नरेंद्र मोदी आरक्षणावर नेमकं काय म्हणाले?
मोदी म्हणाले, काँग्रेसचे एक महाशय अमेरिकेत एका मुलाखतीत ‘वारसा करा’वर बोलले. तेदेखील धक्कादायक होतं. अशा वेळी माझी जबाबदारी आहे की मी लोकांना सत्य सांगायला हवं, वस्तुस्थिती मांडायला हवी, तथ्य मांडायला हवीत आणि मी नेमकं तेच केलं.